गडकरींच्या जन्मदिवशी सामाजिक उपक्रमांचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:07 AM2021-05-28T04:07:51+5:302021-05-28T04:07:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या ६४व्या वाढदिवशी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या ६४व्या वाढदिवशी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन न करता विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या स्थितीमुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन गडकरी यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजप तसेच भाजयुमोतर्फे शहरात विविध जागी सामाजिक उपक्रम घेण्यात आले. कुठे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले; तर कुठे लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्यांना मदत करण्यात आली.
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शहरातील विविध भागांमध्ये वंचितांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. शिवाय काही भागांत गरजूंना शिधावाटपदेखील करण्यात आले. याशिवाय पुढील काही दिवसदेखील उपक्रम चालणार आहेत. ३० मे रोजी जयताळा येथील दाते लेआऊट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गडकरींनी केला शुभेच्छांचा स्वीकार
कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे गडकरी यांनी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गडकरी यांना निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. गडकरी यांनीदेखील फिजिकल डिस्टन्सिंग पाळत शुभेच्छांचा स्वीकार केला.
गडकरींच्या निवासस्थानी दुग्धशर्करा योग
दरम्यान, वाढदिवसाच्या दिवशीच गडकरी यांच्या कुटुंबीयांना आणखी एक गिफ्ट मिळाले. गडकरींचे मोठे पुत्र निखिल यांना कन्या झाली. गडकरींच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नातीचे त्यांच्या निवासस्थानी आगमन झाले. यावेळी गडकरी यांनी सर्वसामान्य आजोबांप्रमाणे नातीचे स्वागत केले. गडकरी यांच्या इतर नातवंडांनी त्यांना स्वहस्ते तयार केलेले शुभेच्छापत्र भेट दिले.