पुरस्काराने व्यक्तीला बळ मिळते
By admin | Published: January 2, 2017 02:12 AM2017-01-02T02:12:53+5:302017-01-02T02:12:53+5:30
मी स्वत: पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित राहत नाही. मात्र पुरस्कारांना माझा विरोधही नाही.
श्याम मानव यांचे प्रतिपादन : सी. मो. फाऊंडेशनतर्फे पुरस्कार वितरण समारंभ
नागपूर : मी स्वत: पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित राहत नाही. मात्र पुरस्कारांना माझा विरोधही नाही. व्यक्तीला पुरस्कारांनी बळ मिळते. काम करण्याचा उत्साह मिळतो. त्यामुळे पुरस्कार वितरणासारखे उपक्रम झालेच पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले.
सी. मो. झाडे फाऊंडेशनच्यावतीने रविवारी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सर्वोदय आश्रम, विनोबा भावे केंद्र येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड़ मा. म. गडकरी होते. मंचावर अतिथी म्हणून दिल्ली येथील रवी कालरा, ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे व सी. मो. झाडे फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यानंतर पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, अपंग-क्रीडा, आरोग्य व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रा. मानव पुढे म्हणाले, सामाजिक क्षेत्रात काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही एक शिक्षक असते. समाजात वैचारिक परिवर्तन घडवायचे असेल, तर त्यासाठी तर्कशुद्ध बुद्धी जागृत करून परिवर्तन घडवून आणावे लागते. सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होत असल्याचा दावा करीत आहे. मात्र अशीच परिस्थितीत कायम राहिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढणार आहेत. नोटाबंदीने खेड्यातील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्याचे सरकार हे भांडवलदारांचे सरकार असल्याचाही त्यांनी यावेळी आरोप केला.
तसेच या कार्यक्रमासाठी दिल्ली येथून आलेले रवि कालरा यांनी मानव सेवेतच परमेश्वर असल्याचे सांगितले. परमेश्वराने मनुष्याला सर्वांधिक बुद्धी दिली असून, ती समाजकार्यासाठी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
पाच मान्यवरांचा गौरव
या समारंभात पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, अपंग-क्रीडा, आरोग्य व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच मान्यवरांना डॉ. गोविंद समर्थ, मीराबेन शाह, ना. बा. सपाटे, सी. मो. झाडे व डॉ. अतुल कल्लावार यांच्या नावे पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. यात जगदीश हरडे, रुबीना पटेल, पंकज वंजारी, कृष्णकुमार मिश्रा व डॉ. राजेश नाईक यांचा समावेश होता. शाल-श्रीफळ, रोख पाच हजार रुपये व प्रमाणपत्र असे त्या पुरस्काराचे स्वरूप होते.