पुरस्कार भरतनाट्यमसाठी, पण दिला गेला मोहिनीअट्टमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:09 PM2019-09-05T12:09:55+5:302019-09-05T12:10:27+5:30

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत २०१९ साठी दिल्या गेलेल्या पुरस्कारांमध्ये एक घोळ दिसून आला. ‘भरतनाट्यम्’मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरूंचा सन्मान ‘मोहिनी अट्टम’साठी करण्यात आला.

The award was declared to Bharatanatyam, but gave to MohiniAttam | पुरस्कार भरतनाट्यमसाठी, पण दिला गेला मोहिनीअट्टमला

पुरस्कार भरतनाट्यमसाठी, पण दिला गेला मोहिनीअट्टमला

googlenewsNext
ठळक मुद्दे‘भरतनाट्यम्’मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरूंचा सन्मान ‘मोहिनी अट्टम’साठी

अंकिता देशकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारतर्फे दिले जाणारे पुरस्कार ‘नि:स्पृह’ पद्धतीने दिले जात असले तरी, या पुरस्कारांसाठीची निवड प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत २०१९ साठी दिल्या गेलेल्या पुरस्कारांमध्ये एक घोळ दिसून आला. ‘भरतनाट्यम्’मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरूंचा सन्मान ‘मोहिनी अट्टम’साठी करण्यात आला. याबाबत लोकमतच्या प्रतिनिधीने चौकशी केली असता, तो घोळ मोठा असल्याचे स्पष्ट होत आहे.
सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध कलाप्रकारातील १२ ज्येष्ठ कलावंतांना २०१९ साठी पुरस्कृत करण्यात आले. त्यात नाटक विभागासाठी सतीश पुळेकर, कंठ संगीतासाठी कमल भोंडे, उपशास्त्रीय संगीतासाठी मंगला जोशी, मराठी चित्रपटासाठी मनोहर आचरेकर, कीर्तनासाठी तारा राजाराम देशपांडे, शाहिरीसाठी शाहीर अंबादास तावरे, नृत्यासाठी रत्नम जनार्दनम्, आदिवासी गिरीजनसाठी नीळकंठ शिवराम उईके, वाद्यसंगीतासाठी अप्पा वढावकर, तमाशासाठी हसन शहाबुद्दीन शेख, लोककलेसाठी लता सुरवसे आणि कलादानासाठी सदाशिव देवराम कांबळे यांचा समावेश आहे. या १२ कलावंतांची निवड त्यांनी ज्या कलाप्रकारात महत्त्वाचे योगदान दिले आहे, त्यासाठी करण्यात आली... हे खरे असले तरी, पेपर सोडविला गणिताचा अन् मार्क मिळाले भूगोलासाठी, अशी काहीशी स्थिती या पुरस्कार वितरणात दिसून येत आहे.
ख्यातकीर्त नृत्यगुरू रत्नम जनार्दनम् यांच्याबाबतीत असाच काहीसा प्रकार घडल्याचे स्पष्ट होत आहे. रत्नम जनार्दनम् यांचे भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्यप्रकारातील योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या हातून आजवर अनेक विद्यार्थी घडले आणि देश-विदेशात त्यांच्या विद्यार्थिनी भरतनाट्यम्साठी कार्य करीत आहेत. त्यांच्या मध्य भारतातील प्रख्यात प्रतिभा नृत्य मंदिराच्या माध्यमातून आतापर्यंत ३२ अरंगेत्रम् (प्रथम रंगमंचीय सादरीकरण) झाले, यावरूनच त्यांच्या या नृत्यप्रकारातील योगदानाचे आकलन होते. मात्र, सांस्कृतिक संचालनालयामार्फत त्यांना आश्चर्यकारकरीत्या ‘मोहिनी अट्टम’ या शास्त्रीय नृत्यप्रकारासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मोहिनीअट्टम कुठेच नाही!
रत्नम जनार्दनम् यांनी विवाहापूर्वी केरळमध्ये असताना कलामंडलम् मन्नादियार व सदनम् लक्ष्मी कुट्टी यांच्याकडून भरतनाट्यम् आणि मोहिनीअट्टम् नृत्याचे कौशल्य पारंगत केले. १९७१ साली विवाहानंतर त्या नागपुरात स्थायिक झाल्या. अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळातून त्यांनी नृत्यात विशारद केले. प्रतिभा नृत्य मंदिराची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक विद्यार्थिनींना त्यांनी तयार केले. मात्र, त्यांची संपूर्ण कारकीर्द भरतनाट्यम्कडेच केंद्रित असल्याचे त्यांच्या एकूणच कार्यवृत्तांवरून स्पष्ट होते. प्रतिभा नृत्य मंदिराच्या संकेतस्थळावरही मोहिनीअट्टमचा साधा उल्लेखही दिसून येत नाही किंवा, मोहिनीअट्टम या प्रकारासाठी नागपुरात म्हणा वा राज्यात त्यांनी केलेल्या कोणत्याही कार्याची माहिती नाही. असे असताना, त्यांना हा दिलेला पुरस्कार मोहिनीअट्टमसाठी नसून भरतनाट्यम्साठी तर नाही ना... असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर असे असेल तर हा घोळ नेमका कुणाकडून झाला, याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक संचालनालयाला देणे भाग पडणार, हे निश्चित!
भरतनाट्यम् तांडवप्रधान तर मोहिनीअट्टम लास्यप्रधान
भरतनाट्यम् हा शास्त्रीय नृत्यप्रकार तामिळनाडूमध्ये उदयास आला तर मोहिनीअट्टम हा शास्त्रीय नृत्यप्रकार केरळमध्ये उदयास आला. या दोन्ही नृत्यप्रकाराची धाटणी परस्परभिन्न असून भरतनाट्यम्मध्ये प्रचंड गती, पदलालित्य आणि चेहºयावरील भावनेला महत्त्व आहे. मुळात हा नृत्यप्रकार तांडवप्रधान म्हटल्या जातो, तर मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार लास्यप्रधान अर्थात पूर्णत: भावोत्कटता व्यक्त करणारा आहे. शिवाय, दोन्ही नृत्यप्रकारातील वेशभूषा भिन्न आहे. तांडवप्रकारामुळे भरतनाट्यम् प्रचंड लोकप्रिय झाले तर, लास्याला अधिक महत्त्व असल्यामुळे मोहिनीअट्टम स्वत:चे अस्तित्व शोधते आहे.

Web Title: The award was declared to Bharatanatyam, but gave to MohiniAttam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.