सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून नाकारला पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 02:10 AM2021-01-15T02:10:53+5:302021-01-15T02:11:16+5:30
कार्यक्रमात धर्म येणं मान्य नाही : मनोहर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कार्यक्रमस्थळी सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून प्रसिद्ध कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे. कार्यक्रमात सहभागी होऊन पुरस्कार स्वीकारणार, असे संमतीपत्र त्यांनी आधी दिले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी पुरस्कार नाकारत असल्याचा संदेश आयोजकांना पाठविला.
परंपरेप्रमाणे साहित्य संघातर्फे सरस्वतीची प्रतिमा ठेवली. यामुळे नाराज डॉ. मनोहर यांनी कार्यक्रमस्थळी येऊन पुरस्कार घेण्यासच नकार दिला. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल, असं वाटलं होतं. हा साहित्यिक कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही. म्हणून मी हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे पत्र डॉ. मनोहर यांनी साहित्य संघाला पाठविले.
डॉ. यशवंत मनोहर यांनी त्यांचे तत्त्व जपावे. हा सार्वजनिक सोहळा आहे आणि सरस्वती प्रतिमा ठेवणे ही आमची परंपरा आहे. ती परंपरा कुणामुळे खंडित होणार नसल्याचे संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी म्हटले.