नागपूर मनपाला 'जिओस्मार्ट इंडिया एक्सलन्स'चा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 08:46 PM2022-11-16T20:46:38+5:302022-11-16T20:47:06+5:30
Nagpur News नागपूर महापालिकेला शहरातील सुरक्षा आणि गतिशीलतेसाठी ‘जिओस्मार्ट इंडिया एक्सलन्स’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
नागपूर : नागपूर महापालिकेला शहरातील सुरक्षा आणि गतिशीलतेसाठी ‘जिओस्मार्ट इंडिया एक्सलन्स’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिओस्पॅटेटिअल वर्ल्ड ॲडव्हान्सिंग नॉलेज फॉर सस्टेनेबिलिटीच्यावतीने हैदराबाद येथे आयोजित सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी मनपा वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता रवी बुंधाडे उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेने तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीद्वारे रस्ता सुरक्षिततेसाठी इंटेलिजेंट सोल्युशन्स हा प्रकल्प शहरात सुरू केला आहे. याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहायाने नागपूर शहरातील रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या ५० टक्केने कमी करण्याचे ध्येय मनपाचे आहे. अशाप्रकारे हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.