कर्तव्यतत्परता दाखवून अपघात टाळणाऱ्या ९ रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कार
By नरेश डोंगरे | Published: April 2, 2024 09:09 PM2024-04-02T21:09:54+5:302024-04-02T21:10:33+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
नागपूर : कर्तव्य तत्परता दाखवून रेल्वेचे संभाव्य अपघात टाळणाऱ्या महाराष्ट्रातील ९ अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन मध्य रेल्वे प्रशासनाने आज त्यांचा सत्कार केला. यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. विवेक गजभिये आणि साहेब हुसेन अशी सत्कारप्राप्त कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गजभिये मांजरी सी केबिनमध्ये स्थानक उपव्यवस्थापक आहेत. तर, हुसेन हे चिचोडा रेल्वे स्थानकात उपव्यवस्थापक आहेत.
१८ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री विवेक गजभिये कर्तव्यावर असताना त्यांना एका मालगाडीच्या ब्रेक व्हॉनच्या १५ व्या वॅगनमधून हॉट एक्सेल (धूर आणि आग) होत असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ स्थानक व्यवस्थापक माजरी आणि ट्रेनच्या लोको पायलटला वॉकी-टॉकीवर ही माहिती दिली. परिणामी गाडीला लाल सिग्नल दाखवून ट्रेन मांजरी येथे थांबवण्यात आली. तपासणी नंतर हॉट एक्सल वॅगन ट्रेनपासून वेगळी करण्यात आली. गजभिये यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.अशाच प्रकारे ९ फेब्रुवारी २०२४ ला रात्रीच्या वेळी चिचोडा स्थानकावर कार्यरत असताना साहेब हुसेन यांना दारीमेटा स्थानकावर जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिन पासून ८ व्या वॅगनमध्ये हॉट एक्सल दिसला. त्यांनी तात्काळ ट्रेनच्या इंजिन चालक आणि गार्डला माहिती देऊन काही अंतरावर ही ट्रेन थांबवली. संबंधित कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून 'हॉट एक्सल' अग्निशामक यंत्राच्या मदतीने विझवण्यात आला. धोका कमी झाल्यानंतर ही वॅगन ५ किलोमिटर पुढे नेऊन नरखेड स्थानकात गाडीपासून वेगळी करण्यात आली.
अशाच प्रकारे मुंबई विभागातील विनोद संतोष सपकाळे (सहायक, कोचिंग डेपो, सीएसएमटी, मुंबई) आणि शाहिद अन्सारी (कनिष्ठ अभियंता, इलेक्ट्रिकल लोको शेड, कल्याण), पुणे विभागातील रोहित पोहेकर (वरिष्ठ विभाग अभियंता, सीअॅन्डडब्ल्यू, पुणे) आणि संतोष भिकाजी (गेटमन मळवली, पुणे), सोलापूर विभागातील विजय कुमार राम (ट्रॅक मेंटेनर, दौंड, सोलापूर) तसेच भुसावळ विभागातील जयप्रकाश (स्थानक उपव्यवस्थापक, भिगवण, सोलापूर) तसेच भुसावळ विभागातील गणेश गाडगे (पॉइंटसमन, नाशिकरोड, भुसावळ) यांनीही रेल्वेची संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्याची दखल घेऊन या सर्व ९ जणांचा सत्कार मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्या हस्ते आज सीएसएमटीच्या सभागृहात करण्यात आला. त्यांना रोख, प्रशस्तीपत्रक, शाळ, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन गाैरविण्यात आले. यावेळी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.