सायकलिंगद्वारे 'ग्लोबल वॉर्मिंग' विषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:29 PM2019-12-26T23:29:25+5:302019-12-26T23:31:31+5:30
मराठवाड्यातील १३ युवकांचा कारवां ग्लोबल वॉर्मिंगच्या जागृतीसाठी सायकलने वाराणसीच्या प्रवासाला निघाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारमाही वाहणाऱ्या नद्यांचे प्रदूषण आज प्रचंड वाढले आहे. प्रदूषणमुक्तीसाठी अनेक प्रयत्न होत असले तरी त्याचे परिणाम दिसत नाहीत. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात नद्या प्रदूषित होत आहे. वाराणसीच्या गंगेचीही अशीचअवस्था आहे. सरकारने गंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्याची मोहीम हाती घेतली असली तरी त्याचे परिणाम दिसत नाहीत. नेमके हेच हेरून मराठवाड्यातील १३ युवकांचा कारवां ग्लोबल वॉर्मिंगच्या जागृतीसाठी सायकलने वाराणसीच्या प्रवासाला निघाला आहे. त्या ठिकाणी जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न हा कारवां करणार आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील हे युवक २१ डिसेंबरला वाराणसीच्या दिशेने मार्गस्थ झाले. बुधवारी सायंकाळी ते नागपुरात दाखल झाले आणि गुरुवारी पहाटे मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना झाले. ‘पॅडल टू गो’ या सायकलिंग ग्रुपतर्र्फे ‘रॅली फॉर रिव्हर आणि ग्लोबल वॉर्मिग’ हा विषय घेऊन दरवर्षी या तरुणांचा कारवां वर्षाचा अखेरचा दिवस आणि नव्या वर्षाचा पहिला दिवस पर्यावरण बचाओचा संदेश घेऊन निघतो. त्याच्याच मोहिमेचा एक भाग म्हणून या युवकांनी यंदा वाराणसीतील गंगेच्या प्रदूषणाला आवर घालण्यासाठी ही सायकल मोहीम हाती घेतली आहे.
व्यवसायाने रुग्णालय व्यवस्थापक असलेल्या ओंकार गांजुरे या उमद्या तरुणाने त्यासाठी आपल्या कामातून वेळ काढत या तरुणांना एकत्र केले. ओंकारच्या हाकेला प्रतिसाद देत बालाजी बेंबडे, नागनाथ कोडचे, दीपक कदम, महेश अलमकेरे, महेश लंके, वीरेश सुगावे, संदीप आडके, मन्मथ बिरादार, माधव वारे, राजेंद्र पटेल, पवन कापडे, नारायण पोले, रवींद्र डिगोळे, मारोती सलगरे यांनी उदगीर येथून २१ डिसेंबरला वाराणसीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उदयगिरीभूमी ते वाराणशी असा हा १३०० किलोमीटरचा सायकल प्रवास ते करणार आहेत. उदगीर येथून नेत्रदान, देहदान व अवयवदानाचा संकल्प करून या युवकांंचा कारवां महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश भागातील शाळांमध्ये वातावरण बदल व त्याचे होणारे दुष्परिणाम आणि त्यावर करावी लागणारे उपाय याबद्दल माहिती देत आहेत. सोबतच त्या शाळेतील छोट्या मुलांना वृक्षारोपणाचा नवा प्रयोग म्हणजेच सीड बॉल कार्यशाळा घेऊन त्याचे प्रात्यक्षिकही देत एक आहेत. माती-खत-बिया आणि पाणी या सोप्या मिश्रणाचा गोळा करून वृक्ष निर्मिती ही परत या मुलाची नाळ मातीशी जोडण्याचाही ते प्रयत्न करीत आहेत. या तरुणांनी मागीलवर्षी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली होती.