३६२ ग्रामपंचायतींमध्ये कोविडविषयी जनजागृतीचा जागर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:06 AM2021-06-03T04:06:43+5:302021-06-03T04:06:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी माहिती व प्रबोधनाचा जागर ग्रामपंचायतीत सुरू आहे. २७ मेपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी माहिती व प्रबोधनाचा जागर ग्रामपंचायतीत सुरू आहे. २७ मेपासून सुरू झालेल्या या माहिती प्रसारणाच्या मोहिमेत आतापर्यंत ३६२ ग्रामपंचायतींमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागराचे काम केले असून, जिल्ह्यातील ७७८ ग्रामपंचायतींमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. खरीपाचा हंगाम सुरू होणार असून मान्सूनचे आगमन वेळेत होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पेरणी होण्यापूर्वी जनजागृतीची मोहीम पूर्ण करण्याकडे प्रशासनाचा भर आहे. १३ तालुक्यात २६ अधिकाऱ्यांच्या चमू सातत्याने आशा, अंगणवाडी सेविका, स्थानिक पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रश्नांचे, समस्यांचे निराकरण करीत आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी ३५, दुसऱ्या दिवशी ७८, तिसऱ्या दिवशी ५४, चौथ्या दिवशी ४, पाचव्या दिवशी ९५ तर १ जून रोजी ९६ ग्रामपंचायतींमध्ये अधिकाऱ्यांनी दौरे करून माहिती दिली.
लसीकरणाविषयीच्या गैरसमजाला दूर करण्यासाठीही यात माहिती देण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन एकीकडे ग्रामीण भागात जनजागृती अभियानासोबत नेमक्या व प्रभावी वैद्यकीय उपचारासाठी अधिकाऱ्यांचेदेखील प्रशिक्षण निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे ७ ते १८ जून या कालावधीत विशेष प्रशिक्षण पूर्ण केले जाणार आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका विशेषतः लहान मुलांची अतिजोखीम लक्षात घेता, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी या प्रशिक्षणाची आखणी करण्याचे निर्देश दिले आहे.