माैदा तालुक्यात ‘म्युकरमायकाेसिस’बाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:08 AM2021-05-29T04:08:12+5:302021-05-29T04:08:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये म्युकरमायकाेसिस या आजाराबाबत जनजागृती करायला सुरुवात करण्यात आली आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये म्युकरमायकाेसिस या आजाराबाबत जनजागृती करायला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये दाेन पथके तालुक्यात दाखल झाले आहेत. ते २८ मे ते ८ जून या काळात जनजागृती करणार आहेत, अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.
माैदा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. नागरिकांना काेराेना व त्यानंतर हाेणाऱ्या म्युकरमायकाेसिस या आजाराबाबत शास्त्रशुद्ध माहिती मिळावी, यासाठी प्रबाेधन करण्यात येणार आहे. यात स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, वैद्यकीय अधिकारी, खासगी डाॅक्टर, शिक्षक, पोलीस पाटील, कोतवाल, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना माहिती दिली जात आहे. ही माेहीम २८ मे ते ८ जून या काळात राबविण्यात येत आहे.
पहिल्या पथकात उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार प्रशांत सांगडे, प्राध्यापक डॉ. बाबूराव हेपट तर दुसऱ्या पथकात कार्यकारी अभियंता बांधवकर, खंड विकास अधिकारी दयाराम राठोड, प्रा. श्रीकांत उमाठे, प्रा. डॉ. सुमेधा वानखेडे यांचा समावेश आहे. ही दोन्ही पथके संपूर्ण तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करणार असल्याचेही तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी सांगितले.