ऑनलाइन प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून महाराज बागेने केली पर्यावरणदिनी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:43+5:302021-06-06T04:06:43+5:30
नागपूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराज बागेच्या वतीने ऑनलाइन प्रश्नमंजूषा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली, तसेच संयुक्त ...
नागपूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराज बागेच्या वतीने ऑनलाइन प्रश्नमंजूषा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली, तसेच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या यंदाच्या ‘रि-इमाजिन-रिक्रिएट-रिस्टोर’ या संकल्पनेनुसार ‘रिइमाजिन-रिक्रिएट-रिस्टोर युवर नेबरहूड’ या उपक्रमाला प्रारंभ केला.
शहरातील विविध महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने महाराज बाग प्राणिसंग्रहालयाने कमला नेहरू महाविद्यालयाच्या सहकार्याने सकाळी ११ वाजता ऑनलाईन प्रश्नमंजूषा उपक्रम घेतला. यानंतर एफडीसीएमच्या वन परिक्षेत्र अधिकारी कल्पना चिंचखेडे यांचे ‘पर्यावरण’ विषयावर व्याख्यान झाले. प्रश्नमंजूषा विजेत्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. मुख्याध्यापक डॉ. दिलीप बडवाईक, उपमुख्याध्यापक डॉ. प्रदीप दहीकर उपस्थित होते.
दुपारी शासकीय विज्ञान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या यंदाच्या ‘रि-इमाजिन-रिक्रिएट-रिस्टोर’ या संकल्पनेनुसार ‘रिईमाजिन-रिक्रिएट-रिस्टोर युवर नेबरहूड’ या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्या निर्जन कोपऱ्यात टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती तयार करून तो भाग पुनर्जीवित करायचा आहे. तेथील आधीचा व नंतरचा फोटो काढून पाठवायचा आहे. यासाठी महिनाभराचा वेळ देण्यात आला आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रशस्तीपत्र देण्यात येतील. या कार्यक्रमात युरोपियन पोलर बोर्डच्या कार्यकारी सचिव डॉ. रेणुका बढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आत्राम व पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मोहम्मद इब्रिस शेख उपस्थित होते. डॉ. सुनील बावस्कर यांनी दोन्ही कार्यक्रमात मार्गदर्शन केले. महाराज बाग प्राणिसंग्रहालयाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा कावळे चुटे, कमला नेहरू महाविद्यालयातील पर्यावरण विभाग प्रमुख नेहा ठाकूर आणि शासकीय विज्ञान संस्थेचा सहभाग होता.