कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापौरांचा आजपासून जनजागृती दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 01:13 AM2020-07-15T01:13:53+5:302020-07-15T01:15:03+5:30
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी राज्य शासनाच्या दिशानिर्देशांची सर्रास पायमल्ली केली. परिणामी नागपुरात गेल्या काही दिवसात कोविड - १९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाजारात गर्दी होत आहे. पुन्हा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. परिस्थिती बघता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापौर संदीप जोशी १५ ते २१ जुलै दरम्यान शहरात जनजागृती दौरा करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी राज्य शासनाच्या दिशानिर्देशांची सर्रास पायमल्ली केली. परिणामी नागपुरात गेल्या काही दिवसात कोविड - १९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाजारात गर्दी होत आहे. पुन्हा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. परिस्थिती बघता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापौर संदीप जोशी १५ ते २१ जुलै दरम्यान शहरात जनजागृती दौरा करणार आहेत.
महापौर बाजारात जाऊन कोविड - १९ च्या दिशानिर्देशांचे पालन होते किंवा नाही याचा आढावा घेतील. झोन सभापतींसमवेत १५ जुलैला दुपारी ४ ते ७ पर्यंत महाल, गांधीबाग बाजाराचा दौरा करतील. १६ जुलैला कमाल चौक, राणी दुर्गावती, पिवळी नदी, जरीपटका, बोरगाव व मानकापूर परिसराचा दौरा दुपारी ३ ते संध्याकाळी ७ पर्यंत करतील. १७ जुलैला दुपारी ४ ते संध्याकाळी ७ पर्यंत गोकुळपेठ, सदर, सीताबर्डी, गिट्टीखदान बाजाराचा दौरा करतील. १८ जुलैला दुपारी ४ ते संध्याकाळी ७ पर्यंत इतवारी, दहीबाजार, पारडी, डिप्टी सिग्नल, टेलिफोन एक्स्चेंज बाजाराचा, १९ जुलैला दुपारी ४ ते संध्याकाळी ७ पर्यंत महापौर जगनाडे चौक आणि म्हाळगीनगर परिसराचा दौरा करतील. २० जुलैला खामला, धंतोली, गोपालनगर तर २१ जुलैला सक्करदरा, मानेवाडा, मेडिकल, कॉटन मार्केट आणि रामेश्वरी बाजाराचा दौरा करतील.
मनपा निर्देशानुसार दुकाने सुरू करण्यासंदर्भातील काही नियम आहेत. मात्र, हे नियमही पाळले जात नाहीत. दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा व या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दुकान मालकांची आहे. त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. अनेक जण विनाकारण शहरात फिरत आहेत. दुचाकींवर दोन व्यक्ती तर चारचाकी वाहनात पाच-पाच व्यक्ती फिरत आहेत. परिणामी आता नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.