मैदानी खेळापासून दूर, मोबाईल गेम पाॅवरफूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:07 AM2021-03-06T04:07:43+5:302021-03-06T04:07:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘खेलोंगे कुदोंगे बनोंगे खराब, पढोंगे लिखोंगे होंगे नवाब’ अशी म्हण कधी काळी म्हटली जायची. ...

Away from outdoor sports, mobile games are powerful | मैदानी खेळापासून दूर, मोबाईल गेम पाॅवरफूल

मैदानी खेळापासून दूर, मोबाईल गेम पाॅवरफूल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘खेलोंगे कुदोंगे बनोंगे खराब, पढोंगे लिखोंगे होंगे नवाब’ अशी म्हण कधी काळी म्हटली जायची. स्पर्धेच्या युगात ती म्हण मागे पडली आणि खेळण्यालाही नवाबाचीच उपमा दिली गेली. बुद्धीसह सुदृढ आरोग्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रात निर्माण झालेल्या संधींसाठी हे परिवर्तन होते. त्यानंतर तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलले. वैश्विक ग्राम ही संकल्पना उदयास आली आणि या संकल्पनेला मूर्तरूप दिले ते मोबाईल तंत्रज्ञानाने. मोबाईल हाती आला तेव्हा आगामी काळात शिक्षणापासून ते कार्यालयीन कामे आणि अन्य सर्वच्यासर्व घरबसल्या पार पाडले जातील, अशी भविष्यवाणी अनेकांनी केली. ती भविष्यवाणी कोरोना संक्रमणाने वास्तवात साकार केली. आजवर पालक व शिक्षक मुलांना मोबाईलपासून लांब राहण्याचे आवाहन करीत होते, तेच आता मुलांच्या हातात मोबाईल सोपवीत आहेत. संक्रमणापासून वाचण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय होत आहे. मात्र, जसे अतिउपायाचे दुष्परिणाम असतात, तसे मुलांच्या हाती मोबाईल येताच ते दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. मोबाईलमुळे मुलांनी मैदानी खेळांना दांडी मारल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.

मुलांना चटकपटक रंगाचे मोठे आकर्षण असते आणि त्यातल्यात्यात नव्या गोष्टी शिकणे, बघण्याचे वेड जन्मजात असते. शिवाय, आजकाल मोबाईलवर एखादी गोष्ट सर्च केली की त्या सर्चला धरून कंपन्यांकडून मोबाईलधारकाला नवनव्या साईट्स सर्च करण्यासासाठी प्रोत्साहित केले जाते. मुलांच्या हातात मोबाईल आला की हे सर्चचे ऑप्शन मुलांना दिसते आणि मुले मग गेम, व्हिडिओ, म्युझिक, फिल्म्स आदींना अहेतूक सर्च करायला लागतात आणि त्यात गुरफटून जातात. नेमका हाच प्रकार शालेय शिक्षणासाठी मोबाईल हाती घेणाऱ्या मुलांसोबत घडताना दिसून येत आहे. त्याचा परिणाम मुले थोड्याशा अभ्यासानंतर दीर्घकाळ इतर बाबींच्या सर्फिंगमध्ये व्यग्र होत आहेत. यातून बाहेर पडण्यास ते जराही तयार नाहीत. नजर ठेवणाऱ्या पालकांनादेखील ते थापा मारत आहेत आणि याचा परिणाम ते मैदानावर खेळण्यास बाहेर पडत नसल्याचे दिसून येते. मोबाईलच्या चार-पाच इंची स्क्रीनवर सतत असल्याने आणि इवल्याशा स्क्रीनमधून पडणाऱ्या टार्गेटेड प्रकाशाने मुलांच्या डोळ्यांवर दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. शिवाय, डोळ्यांचा थेट कनेक्शन मेंदूशी असल्याने झोपमोड, त्यायोगे येणारी सुस्ती आणि तणाव आदींचे प्रकार वाढले आहेत. मुले कसरती खेळ खेळत नसल्याने शरीराचे स्नायू कमकुवत बनण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेकांना जॉईंट्स दुखण्याचे, मानेचे, बोटे दुखण्याची लक्षणे वाढीस लागली आहेत.

---------------

भ्रमिष्टपणा, नैराश्य येण्याची भीती

मुलांचा मेंदू जास्त ताण सहन करू शकत नाही. मोबाईलचा वापर वाढल्यास मेंदूवर ताण वाढतो. त्यामुळे अस्वस्थता, मोबाईल वाजल्याचा भास, कधीही सेल्फी घेण्याचा मोह, बोटाच्या सतत हालचाली आदींचा भ्रम निर्माण होण्यास सुरुवात होते. डोळे सतत स्क्रीनवर असल्याने डोळ्यांना व त्यायोगे मेंदूला थकवा आणि नंतर तणावात वाढ होते आणि नंतर नैराश्य येण्याची भीती असते.

- डॉ. अभिषेक सोमानी, प्रमुख : मनोविकृतीशास्त्र विभाग, मेयो हॉस्पिटल

-------------

‘मायोपिया’ची समस्या वाढत आहे

‘मायोपिया’ म्हणजे अंधुक दिसण्याची समस्या होय. कॉर्नियातील बिघाड, औद्योगिकीकरण, इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वाढता वापर, आनुवांशिकता, तासन्‌ ता‌स लॅपटॉपवर काम करणे किंवा मोबाईल पाहत राहणे, अशा कारणांनी हा आजार जडतो. वर्तमानात मेयोच्या नेत्ररोग विभागात अशा रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे.

- डॉ. रवी चव्हाण, प्रमुख : नेत्ररोग विभाग, मेयो हॉस्पिटल

------------------

पालक म्हणतात...

मुलांना आवरणे कठीण

संक्रमणाच्या स्थितीमुळे ऑनलाईन शिक्षणाला आम्ही पसंती दिली. मुलेही घरबसल्या शिक्षणाचा आनंद घेत आहेत. मात्र, मुले मोबाईलवर जास्त वेळ घालवत आहेत. त्यांना आवरणे कठीण झाले आहे.

- प्रशांत खडसे, महाल

-------

मोबाईलचे व्यसन जडू नये

मोबाईलद्वारे शिक्षण घेणे सोपे झाले आहे. सोबतच मुले इतर चांगल्या गोष्टीही शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, शिकता शिकता मुले मोबाईल गेममध्ये गुरफटत असल्याचे दिसून येते. मोबाईलचे व्यसन जडण्याची भीती वाढते.

- अशोक लेदे, वाठोडा

----------

कसरती खेळ संपुष्टात आले

आमच्या काळात आम्ही शाळा आणि मैदान या दोन्ही गोष्टीत रमत होतो. मोबाईलमुळे मुले सतत मोबाईलवरच असतात. विटी-दांडू, लगोरी, धापाधूपी, लंगडी, आऊट आऊट अशा खेळांनी आमचे स्नायू बळकट झाले. त्यातुलनेत आताची मुले हे खेळ खेळत नसल्याने कमजोर वाटतात.

- उपासराव भोजापुरे, वाडी

..............

Web Title: Away from outdoor sports, mobile games are powerful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.