नागपुरात ‘अनादी’ कलेचे अप्रतिम सृजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:32 PM2018-08-17T23:32:26+5:302018-08-17T23:33:20+5:30
रंग, आकार आणि पोत याचे आच्छादन म्हणजे, कलावंताच्या जीवनाचे एक पानच असते. ते पान वाचायला, त्याची अनुभूती घ्यायला रसिकाचे डोळेही कलेचे उपासक असायला हवे. तीन पिढीच्या कलावंतांनी आपल्या कुंचल्यातून उमटविलेल्या रंगछटांचे अप्रतिम सृजन ‘अनादी’ आहे. त्यामुळे रसिकांनी हे आनंद म्हणून बघण्यापेक्षा त्यात काय दडलेले आहे, हे बघण्याची रसिकता ठेवावी, असे मत ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रंग, आकार आणि पोत याचे आच्छादन म्हणजे, कलावंताच्या जीवनाचे एक पानच असते. ते पान वाचायला, त्याची अनुभूती घ्यायला रसिकाचे डोळेही कलेचे उपासक असायला हवे. तीन पिढीच्या कलावंतांनी आपल्या कुंचल्यातून उमटविलेल्या रंगछटांचे अप्रतिम सृजन ‘अनादी’ आहे. त्यामुळे रसिकांनी हे आनंद म्हणून बघण्यापेक्षा त्यात काय दडलेले आहे, हे बघण्याची रसिकता ठेवावी, असे मत ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण सोशल फोरम द्वारे ‘अनादी’ या चित्रप्रदर्शनीचे आयोजन मध्यवर्ती संग्रहालयाच्या कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. ‘अनादी’ या कलाप्रदर्शनीचे वैशिष्ट्य म्हणजे ९२ वर्षाचे चित्रकार अरुण मोरघडे, पन्नासीच्या टप्प्यावर असलेले नाना मिसाळ आणि साठीच्या टप्प्यात पोहचणारे दीनानाथ पडोळे यांनी आपल्या कुंचल्यातून आणि कल्पकतेतून साकारलेल्या काही चित्रांचे हे प्रदर्शन आहे. तिघांच्याही नावाच्या आद्यक्षरातून अनादी हे नाव प्रदर्शनीला पडले. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात या तिघांचाही जन्मदिन असल्याने, यानिमित्ताने कलारसिकांना त्यांच्या कलेचे हे सृजन येत्या तीन दिवस अनुभवायला मिळणार आहे.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून प्रमोदबाबू रामटेके उपस्थित होते. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण सोशल फोरमचे दिलीप पनकुले, दीपक कापसे, जयप्रकाश गुप्ता, यांच्यासह चित्रकार विजय बिस्वाल, पंढरीनाथ कुकडे, चंद्रकांत चन्ने यांची उपस्थिती होती. प्रदर्शनीच्या उद्घाटनापूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेशबाबू चौबे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ चित्रकार अरुण मोरघडे यांचे जलरंगातील व्यक्तीचित्र आणि तैलरंगातील वास्तववादी अमूर्तचित्र आदिवासींच्या जीवनशैलीतून अनुभवता येणार आहे. तर नाना मिसाळ यांचे अॅक्रॅलिक रंगातून अमृत सृजन, थम्ब पेंटिंगच्या माध्यमातून बघायला मिळते आहे. राजकारणात रमूनही कलेचा वसा जोपासणारे दीनानाथ पडोळे यांनी कॅन्व्हासवर साकारलेले अलंकारिक शैलीतील चित्र नेत्रदीपक ठरत आहे. या प्रास्ताविक दीनानाथ पडोळे यांनी केले. संचालन किशोर गलांडे यांनी केले.