कृष्णधवल रेषांची अप्रतिम निर्मिती : ब्लॅक बूल आदी इत्यादी
By admin | Published: July 25, 2016 02:29 AM2016-07-25T02:29:19+5:302016-07-25T02:29:19+5:30
कवितांवर चित्र साकारणे तसे कठीणच. मात्र लोकनाथ यशवंत यांच्या बैल या कवितेवर अख्ख्या चित्रपटाची निर्मिती झाल्यानंतर ...
चित्रकला महाविद्यालयात चित्रप्रदर्शनाला सुरुवात
नागपूर : कवितांवर चित्र साकारणे तसे कठीणच. मात्र लोकनाथ यशवंत यांच्या बैल या कवितेवर अख्ख्या चित्रपटाची निर्मिती झाल्यानंतर त्याला कॅनव्हासवर साकारण्याचे अप्रतिम काम प्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी केले. त्यांच्या ‘काळा बैल आदी इत्यादी’ या चित्रप्रदर्शनाचे रविवारी चित्रकला महाविद्यालयात उद््घाटन झाले. बैल म्हणजे असंख्य अडचणींच्या जोखडात असलेल्या शेतमजूरांचे प्रतीक आहे. त्या असंख्य माणसांच्या भावना चंद्रकांत यांनी कृष्णधवल (ब्लॅक अॅन्ड व्हाईट) रेषांच्या अप्रतिम निर्मितीतून साकारल्या आहेत.
चित्रप्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी कवी लोकनाथ यशवंत यांच्यासह मोठ्या पडद्यावर ‘बैल’ हा चित्रपट साकारणारे दिग्दर्शक गिरीश मोहिते, अभिनेता मंगेश देसाई, चित्र समीक्षक प्रमोदबाबू रामटेके, चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विनोद मानकर आदी उपस्थित होते. माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी यावेळी आवर्जून हजेरी लावली.
गेल्या अनेक दिवसांपासून चित्ररसिकांना चंद्रकांत यांच्या कलाविष्काराची प्रतीक्षा होती. चित्र पाहताना या चित्रांची प्रतीक्षा का होती, याची जाणीव होते. रसिक आपल्या भावनेतून त्या चित्रांमधील भावार्थ काढण्याचा प्रयत्न करतील. कुणाला त्यात वास्तविकतेची जाणीव करणारी अप्रतिम कलाकृती दिसली, तर कुणाला कलेचे सौंदर्य दिसले. कुणाला त्यात आंबेडकरांच्या विचारांचा विद्रोह जाणवतो तर कुणाला हे चित्र चंद्रकांत यांनी कॅनव्हासवर उतरविलेला आविष्कार वाटतो. मात्र शेतकरी आत्महत्येच्या गंभीर विषयाचा गाभा घेऊन समाजातील संवेदनशील मनाला पटलेला विचार त्यात असल्याची भावना चंद्रकांत यांनी व्यक्त केली.
लोकनाथ आणि चंद्रकांत यांचा बैल हा शेतमजूराचे प्रतीक आहे. समाजाचे जोखड आणि अनेक अडचणींचा सामना करणारा शेतमजूर किंवा कामगार कधी आत्महत्या करीत नाही, मग जमीनजुमला, घरदार असलेल्या शेतकऱ्याने मृत्यूचा मार्ग का निवडावा? असा सकारात्मक संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. लोकनाथांच्या ४० कवितांमधील भावना चित्ररूपात चंद्रकांत यांनी मांडल्या आहेत. (प्रतिनिधी)
पेंटिंगच्या माध्यमातून गंभीर प्रश्न : गिरीश मोहिते
बैल या कवितेवर चित्रपटाची निर्मिती करताना शेतकऱ्यांच्या आयुष्यातील दाहकता जाणवली. सरकार, समाज, व्यापारी, बाजार समित्या ही सर्व सिस्टीम शेतकऱ्यांच्या विरोधात आहे काय, असे वाटायला लागले. कवितेला चित्रात साकारण्याचे अप्रतिम कार्य चंद्रकांत सरांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील दाहकता समाजापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयोग हा प्रेरणादायी आहे. शेतकरी आत्महत्येवर अनेक संवेदनशील चित्रपट आले. मात्र आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबाची होणारी फरफट, शेतकऱ्यांनी आत्महत्या करूच नये, हा सकारात्मक संदेश घेऊन चित्रपट करायचा आहे आणि त्याची प्रेरणा या चित्रप्रदर्शनातून मिळाली.
हा तर आंबेडकरी विचारांचा विद्रोह : प्रमोदबाबू रामटेके
लोकनाथ यांची कविता डॉ. आंबेडकरांच्या विचारातील विद्रोहाची जाणीव करून देणारी आहे. चंद्रकांत यांचे चित्रही समाजातील वास्तवाविरोधात विद्रोह दर्शविणारे आहेत. त्यांची कला जेवढी सहज तेवढीच कणखर आहे. एखादा विचार समजायला त्याच्या खोलवर शिरून वाचन, मनन, चिंतन करावे लागते. त्यांनी अंत:करणातून ही कलाकृती साकारली आहे. हे चित्र म्हणजे त्यांच्या प्रतिभेच्या खाणीतून निघालेले हिरेमोती आहेत. हा खजिना त्यांनी रसिकांसाठी ठेवला आहे.
शेतकरी व बैलाचे जीवनदर्शन : मंगेश देसाई
बैल या चित्रपटात भूमिका साकारताना राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांचे जगणे जवळून पाहायला मिळाले. बैल व शेतकऱ्याचे जीवन सारखेच आहे. कितीही कष्ट झाले तरी त्याला स्वत:साठी व इतरांसाठी जगावेच लागते. ही वास्तविकता चंद्रकांत सरांनी चित्रांमधून मांडली आहे. या चित्रांमधून अनेक अर्थ कळायला लागले आहेत. शेतकऱ्याने आत्महत्या करूच नये, हा सकारात्मक भाव त्यात आहे. बैल चित्रपट हा आपल्या करिअरमधील मैलाचा दगड आहे. तसाच चित्रप्रदर्शनातून आलेला सकारात्मक विचार आमच्यासाठी बँक बॅलन्स आहे.
कवी म्हणून सर्वकाही मिळाले : लोकनाथ यशवंत
माझ्या कवितेतून एखादा चित्रपट व्हावा, ही बाब सुखद धक्का देणारी होती. त्यानंतर या कवितेवर तीन नाटके झाली आणि आता चंद्रकांत सरांसारख्या मोठ्या चित्रकाराने या कविता कॅनव्हासवर साकारून मला मोठे केले. कवी म्हणून सर्वस्व मिळविल्याची जाणीव मला होत आहे. स्वत:ला जे पटेल ते आजपर्यंत केले आहे. त्यांचे हे अप्रतिम प्रदर्शन माझ्या यशाचे प्रतीक आहे.