भन्नाटच... वाहतुकीचे नियम पाळा अन् ‘रिवॉर्डस्’ मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2023 08:48 PM2023-01-04T20:48:57+5:302023-01-04T20:50:22+5:30
Nagpur News शिस्त पाळून देशविकासात योगदान देणाऱ्या अशाच लोकांना डोळ्यासमोर ठेवून नागपुरात एक भन्नाट संकल्पना राबविण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना ‘ट्रॅफिक रिवॉर्डस्’ या ‘मोबाइल ॲप’च्या माध्यमातून ‘रिवॉर्डस्’ मिळणार आहेत.
नागपूर : शहरातील वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र, अनेक सजग नागरिक घाईच्या वेळीदेखील वाहतुकीचे नियम पाळण्याबद्दल दक्ष असतात. एका अर्थाने शिस्त पाळून देशविकासात योगदान देणाऱ्या अशाच लोकांना डोळ्यासमोर ठेवून नागपुरात एक भन्नाट संकल्पना राबविण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना ‘ट्रॅफिक रिवॉर्डस्’ या ‘मोबाइल ॲप’च्या माध्यमातून ‘रिवॉर्डस्’ मिळणार आहेत. याचा उपयोग विविध प्रकारच्या मोठ्या ब्रॅंड्सच्या खरेदीसाठीदेखील करता येणार आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असून, यात शासनासह ‘व्हीएनआयटी’चेदेखील सहकार्य मिळाले आहे.
१०८ व्या ‘इंडियन सायन्स काॅंग्रेस’मध्ये ही भन्नाट संकल्पना मांडण्यात आली आहे. देशातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा ‘ट्रॅफिक रिवाॅर्डस्’चे तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या सोशल इम्पॅक्ट संस्थेने केला आहे. पुढील महिन्यात लक्ष्मीनगर चौक ते जापानी गार्डन या मार्गावर हा अभिनव प्रयोग सुरू करण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेसोबत या संदर्भातील करार करण्यात आला आहे. अगोदर दहा चौकांमध्ये हा प्रयोग राबविण्यात येईल. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी नियमितपणे याचा उपयोग होईल. मागील दोन वर्षांपासून या तंत्रज्ञानावर कार्य सुरू होते. तंत्रज्ञान विकासासाठी ‘व्हीएनआयटी’ची मौलिक मदत झाली. तसेच शासनाचे मोठे सहकार्य मिळाले. या संकल्पनेतून लोक स्वत:हून वाहतुकीचे नियम पाळतील व अपघातांमध्ये कमी येईल, असा विश्वास ‘ट्रॅफिक रिवॉर्डस्’चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर गौतम यांनी व्यक्त केला.
‘ॲप’ आणि ‘बारकोड’चा उपयोग
ट्रॅफिक रिवार्डस् या तंत्रज्ञानात प्रत्येक चौकातील सिग्नलवर ‘सेन्सर्स’ बसविण्यात येतील. वाहनांना ट्रॅक करण्यासाठी बारकोड देण्यात येईल. तसेच ‘मोबाइल ॲप’च्या माध्यमातून नोंदणी होईल. चौकातील २० मीटरच्या अंतरात सेन्सर्स काम करतील. दर सेकंदाला २०० वाहने स्कॅन करण्याची क्षमता ‘सेन्सर्स’मध्ये ठेवण्यात आली आहे. सर्व वाहतूक नियमांचे पालन केल्यास ‘सेन्सर्स’ वाहनांना ट्रॅक करतील व संबंधित व्यक्तीच्या खात्यात ‘क्रेडिट पॉईंट्स’ जमा होत जातील. या प्रकल्पात ७५ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व स्थानिक ब्रॅंड्स जुळले आहेत. पॉईंट्सला रिडीम करून त्या ब्रॅंड्सची सेवा किंवा वस्तू खरेदी करता येणार आहेत.