बसेसची संख्या कमी झाल्यामुळे वेतनावर कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:35 AM2020-12-17T04:35:50+5:302020-12-17T04:35:50+5:30
नागपूर : कोरोनामुळे सहा महिने एसटीची चाके ठप्प होती. त्यानंतर हळुहळू एसटी बसेसची वाहतूक सुरु झाली. परंतु सुरुवातीला प्रवाशांचा ...
नागपूर : कोरोनामुळे सहा महिने एसटीची चाके ठप्प होती. त्यानंतर हळुहळू एसटी बसेसची वाहतूक सुरु झाली. परंतु सुरुवातीला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद होता. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर एसटीच्या बसेसमध्ये वाढ करण्यात आली. परंतु सध्या जिल्ह्यात केवळ ७५ टक्केच वाहतूक सुरु असल्यामुळे रोजंदारी चालक-वाहकांना काम मिळत नसून त्यांच्या वेतनावर त्याचा परिणाम पडत असल्याची स्थिती आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळात सहा महिने वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान केवळ परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्याचे काम एसटीच्या बसेसद्वारे करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागात एसटीच्या बसेस सुरु करण्यात आल्या. परंतु सुरुवातीच्या काळात २२ प्रवाशांना घेऊन वाहतूक सुरु करण्यास परवानगी मिळाली. मात्र एका बसमध्ये केवळ १० ते १२ प्रवासी मिळत होते. हळुहळू या प्रवाशांमध्ये वाढ झाली. पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी मिळाली. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांश फेऱ्या बंद असल्यामुळे सध्या रोजंदारी चालक-वाहकांना काम मिळत नसून त्यांना रजा देण्यात येत आहे. याचा परिणाम त्यांच्या वेतनावर होत असून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने लवकर ग्रामीण भागातील फेऱ्या सुरु करण्याची मागणी रोजंदारी चालक-वाहक करीत आहेत.
.........
जिल्ह्यातील आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण आगार : ८
एकूण बसेसची संख्या : ४२५
एकूण चालक : ९२५
एकूण वाहक : ७५०
कोरोनाच्या पूर्वी होणाऱ्या फेऱ्या : ३६४०
कोरोना सुरु असताना होत असलेल्या फेऱ्या : २७२०
...........
१०० चालक-वाहकांचे होतेय नुकसान
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण ९२५ चालक आणि ७५० वाहक आहेत. परंतु कोरोनामुळे केवळ ७५ टक्के वाहतूक सुरु असल्यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्या बंद आहेत. यात नियमित कर्मचाऱ्यांना काम देण्यात येत असल्यामुळे रोजंदारी चालक-वाहकांना काम मिळेनासे झाले आहे. त्यांना काम मिळत नसल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या वेतनावर होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. नागपूर विभागात १०० चालक-वाहकांना काम मिळत नसल्याची स्थिती आहे.
.........
दररोज १२ लाखाचे नुकसान
कोरोनापूर्वी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला दररोज ४८ लाख रुपये दररोज उत्पन्न मिळायचे. परंतु सद्यस्थितीत विभागाला केवळ ३६ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. यात विभागाला एका दिवसाला १२ लाखाचा फटका बसत आहे.
.......
एसटी महामंडळाने योग्य नियोजन करावे
‘एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील अधिकारी-कर्मचारी चांगले कार्य करीत आहेत. परंतु प्रशासनाने प्रवाशांना बसेसमध्ये प्रवास करणे सुरक्षित आहे, याची शाश्वती देऊन त्याचा प्रचार-प्रसार करणे आवश्यक आहे. एसटी महामंडळाने याबाबत योग्य नियोजन करण्याची गरज आहे.’
-अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना
.........
लवकरच रोजंदारी कामगारांना काम मिळेल
‘सध्या ग्रामीण भागातील फेऱ्या बंद आहेत. यात शाळकरी मुलांची वाहतूकही बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील रोजंदारी-चालक वाहकांना काम मिळत नाही. परंतु लवकरच या फेऱ्या सुरू होऊन रोजंदारी चालक-वाहकांना काम मिळेल.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
......