अॅक्सीस बँकेच्या अधिका-यांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 04:42 PM2017-08-12T16:42:32+5:302017-08-12T16:42:38+5:30
चंद्रपूरच्या तरुणाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्याच्या नावे बँक अधिका-याने गैरव्यवहार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
नागपूर, दि. 12 - चंद्रपूरच्या तरुणाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्याच्या नावे बँक अधिका-याने गैरव्यवहार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी अॅक्सीस बँकेच्या सिव्हील लाईन शाखेच्या अधिका-यासह चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. अनिल वर्मा, समीर जोशी, ओम दिवान, युवराज ठाकरे अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल वर्मा अॅक्सीस बँकेच्या करेंसी कार्ड विभागाचे व्यवस्थापक असून, समीर जोशी रामदासपेठेतील वॉलस्ट्रीट फॉरेक्स, लि. कंपनीचे व्यवस्थापक आहे. ही कंपनी विदेशी चलनाच्या अदलाबदलीचे काम करते, असे पोलीस सांगतात. दिवान आणि ठाकरे हे त्यांचे साथीदार आहेत.
चंद्रपूरच्या अरविंदनगरात राहणारे हरविंदरसिंग बजराजसिंग वधावन (वय २८) म्युच्युअल फंडांचे काम करतात. मार्च २०१६ मध्ये हरविंदरसिंग यांना त्यांच्या नावाचे ट्रॅव्हल्स करेन्सी कार्ड आणि बनावट व्हीजा तयार करण्यात आल्याचे माहित पडले. यासाठी उपरोक्त आरोपींनी हरविंदरसिंगच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्यांच्या बनावट स्वाक्ष-या करून त्याचा गैरवापरही केला. ही बनवाबवनी माहित झाल्यानंतर हरविंदरसिंग यांनी संबंधितांकडे संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
त्यामुळे त्यांनी ८ मार्च २०१६ ला सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर या प्रकरणात वर्मा, जोशी, दिवान आणि ठाकरे या चौघांविरुद्ध फसवणूकीच्या आरोपाखाली शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.
व्यवहार अंधारात
ट्रॅव्हल्स करेन्सी कार्ड आणि बनावट व्हीजा तयार करून त्याचा गैरवापर केल्याचे पोलीस रेकॉर्डवर आले आहे. मात्र, नेमका व्यवहार कोणता झाला, ते कळायला मार्ग नाही. आरोपींनी आर्थिक गैरव्यवहार केला की आणखी काही, त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलीस सांगतात.