Ayodhya Verdict : नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 07:59 PM2019-11-09T19:59:46+5:302019-11-09T20:00:57+5:30
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दिवसभर रेल्वेस्थानकावर ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दिवसभर रेल्वेस्थानकावर ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. याशिवाय आऊटरकडील भागातही लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले.
शनिवारी अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले. मुख्य प्रवेशद्वारावर बंदुकधारी पोलीस तैनात करण्यात आले. प्रत्येक प्लॅटफार्मवर लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान नजर ठेऊन होते. रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांनी रात्री रेल्वेस्थानकावर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकारी, जवानांना सूचना दिल्या. संशयित प्रवाशांची हँड मेटल डिटेक्टर तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. संत्रा मार्केटकडील भागातही पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. रेल्वेस्थानकाच्या आऊटरकडील भागातही पोलिसांची नेमणूक करण्यात आली. मुंबई एण्ड, दिल्ली लाईन आणि इमामवाडा परिसरातील रेल्वे रुळावर पोलीस तैनात करण्यात आले. रेल्वेस्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात आली. रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्या साहित्याची बॅग स्कॅनर मशीनद्वारे तपासणी करूनच त्यांना आत सोडण्यात आले. याशिवाय अजनी, इतवारी रेल्वेस्थानकावरही रेल्वे सुरक्षा दल तसेच लोहमार्ग पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली.
प्रवाशांनी रद्द केले तिकीट
शनिवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रवास करण्याचे टाळले. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षण कार्यालय गाठून प्रवासाचे तिकीट रद्द केले. दिवाळीनंतर रेल्वेगाड्यातील प्रवाशांची संख्या कमी होत आहे. वेटिंगची स्थिती पूर्वपदावर येत आहेत. यातच शनिवारी निकाल लागणार असल्यामुळे बहुतांश प्रवाशांनी आपला प्रवासाचा बेत रद्द केला. प्रवाशांनी आपले कन्फर्म असलेले तिकीट रद्द केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
तीन दिवस कडेकोट बंदोबस्त राहणार
‘सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, जवानांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी आरपीएफचे जवान परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. आणखी तीन दिवस नागपूर रेल्वेस्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येईल.’
भवानी शंकर नाथ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल