आयुर्वेद रुग्णालयात आता रिसर्च ओपीडी
By admin | Published: December 20, 2015 02:57 AM2015-12-20T02:57:56+5:302015-12-20T02:57:56+5:30
औषधी वनस्पती मिळणे कठीण झाले आहे. नांदेड येथील शासकीय आयुर्वेद व युनानी रसशाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
नागपूर : औषधी वनस्पती मिळणे कठीण झाले आहे. नांदेड येथील शासकीय आयुर्वेद व युनानी रसशाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे, या रसशाळेतून केवळ दोन किंवा तीनच औषधे मिळत आहे. रुग्णालयाला ५० औषधांची गरज पडते. ही गरज महाविद्यालयाच्या वाढलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांकडून भरून काढणे शक्य होणार आहे. यातूनच रिसर्च ओपीडीचा पर्याय समोर आला आहे. याचे उद्घाटन रविवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुकावार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. मुकावार म्हणाले, महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या २१ वरून ६० झाली आहे. या विद्यार्थ्यांना रिसर्च करण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचा लाभ गरीब रुग्णाना मिळावा या हेतूने त्वचा रोग संशोधन बाह्यरुग्ण विभाग (रिसर्च ओपीडी) सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी संबंधित विषयातील तज्ञ चिकित्सक सेवा देतील. तसेच रुग्णांना विविध प्रकारचे काढे, चूर्ण व आवश्यक गुणवत्ताप्राप्त आयुर्वेदिक औषधे रसशास्त्र विभागातर्फे निर्मित करून पुरविण्यात येईल. या रिसर्च ओपीडीसाठी रुग्णालयाच्या सर्व विभागाचे वरिष्ठ डॉ. सुभाष राऊत, डॉ. प्रकाश काबरा, डॉ. मीरा औरंगाबादकर, डॉ. विजय पात्रीकर, डॉ. हरी उमाळे, डॉ. मनोज गायकवाड, डॉ. अर्चना भड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता या रिसर्च ओपीडीचे उद्घाटन होईल. यावेळी मंत्र्यांसोबत आ. सुधाकर कोहळे, आ. मिलिंद माने व आ. नागो गाणार उपस्थित राहतील, अशी माहितीही त्यांनी दिली. पत्रपरिषदेत विभाग प्रमुख डॉ. सुधीर देशपांडे, डॉ. राजकुमार खियानी, डॉ. प्रज्ञा स्वान, डॉ. गणेश टेकाळे, डॉ. मनीष भोयर उपस्थित होते.(प्रतिनिधी)