आयुर्वेदिक विद्यार्थी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:37 AM2017-09-06T01:37:55+5:302017-09-06T01:38:25+5:30
वसतिगृहातील समस्येकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांना त्रास देणाºया वसतिगृह अधीक्षकांच्या बदलीला घेऊन व अधिष्ठाता यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदवीच्या ५० वर विद्यार्थी व इंटर्न यांनी मिळून .....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वसतिगृहातील समस्येकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांना त्रास देणाºया वसतिगृह अधीक्षकांच्या बदलीला घेऊन व अधिष्ठाता यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदवीच्या ५० वर विद्यार्थी व इंटर्न यांनी मिळून मंगळवारी सकाळपासून संप पुकारला. उद्या बुधवारी हे विद्यार्थी जिल्हाधिकाºयांना आपले निवेदन देणार आहेत.
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थी व वसतिगृह अधीक्षक डॉ. मिलिंद कांबळे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. संपावर गेलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावर आम्हाला गुंड म्हणतात, तर डॉ. कांबळे आम्हाला गुंडगिरी करीत असल्याचे संबोधतात. पदवी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात पदव्युत्तर विद्यार्थी राहू देतात; पण इंटर्न विद्यार्थ्यांना राहणे नियमबाह्य असल्याचे सांगून अधिष्ठाता व वसतिगृह अधीक्षक महाविद्यालयातून काढून टाकण्याची धमकी देतात. गेल्या वर्षी वसतिगृहातील ज्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी होती, अशा निवडक ३० विद्यार्थ्यांकडून ७२ हजार रुपये अवैधपणे वसूल केले. त्यातून चार वॉटर कूलर घेतले. सध्या हे वॉटर कूलर धूळखात पडले आहेत. वसतिगृह अधीक्षक वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्रास देऊन ‘इंटरनल बॅक’ ठेवण्याची धमकी देतात, याला त्रासाला कंटाळून मंगळवारी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संप पुकारला.
बुधवारी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे, त्यानंतरही कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असेही विद्यार्थी म्हणाले.
शिस्त महत्त्वाची
विद्यार्थ्यांची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाची असते. यामुळे वसतिगृहात शिस्तीचे पालन होणे महत्त्वाचे आहे. वसतिगृह अधीक्षक याकडे विशेष लक्ष देऊन असताना त्यांना विरोध होत आहे, तरीही विद्यार्थ्यांची समजूत काढणे सुरू आहे.
-डॉ. गणेश मुक्कावार
अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय