‘अॅक्रीटेशन’साठी आयुर्वेदला अल्टिमेटम
By admin | Published: March 20, 2017 02:01 AM2017-03-20T02:01:11+5:302017-03-20T02:01:11+5:30
सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे येत्या दोन वर्षात, तर रुग्णालयाचे वर्षभरात
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे प्रशासनाला पत्र
नागपूर : सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे येत्या दोन वर्षात, तर रुग्णालयाचे वर्षभरात ‘अॅक्रीटेशन’ (प्रमाणन) करा, असे निर्देश केंद्रीय परिषदेने पत्र पाठवून आयुर्वेदला दिल्याने प्रशासन जोमाने कामाला लागले आहे.
आयुर्वेद महाविद्यालयामध्ये दरवर्षी पदवी(यूजी)च्या १०० विद्यार्थ्यांना, तर पदव्युत्तर(पीजी)च्या ८४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या(सीसीआयएम)मानकानुसार कॉलेज व रुग्णालयात शिकविण्यात येणाऱ्या सर्व विषयात ‘पीएच.डी.’ असणे आवश्यक आहे. पण सध्या केवळ तीन विषयात ‘पीएच.डी.’ असून, शिक्षकांअभावी उर्वरित ११ विषयातील ‘पीएच.डी.’ही प्रतीक्षेत आहे. ‘सीसीआयएम’ने डिसेंबर २०१६ मध्ये पत्र पाठवून परिषदेच्या निकषानुसार सर्व बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश आयुर्वेद प्रशासनाला दिले आहे. १८० वरून ३०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रशासनाने राज्य शासनाकडे दोन महिन्यांपूर्वी परवानगीसाठी पाठविले आहे. शिवाय पाचपैकी राज्य शासनाकडून तीन वसतिगृह बांधकामांना मंजुरी मिळाली आहे. मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, फर्निचर व बांधकाम आदींची पूर्तता करून रुग्णालयाचे ‘अॅक्रीटेशन’ २०१८ पर्यंत, तर महाविद्यालयाचे ‘अॅक्रीटेशन’ २०१९ पर्यंत करण्याचे आदेश परिषदेने पत्राद्वारे प्रशासनाला दिले आहे. निकष पूर्ततेनंतर परिषदेचे पाच सदस्यीय चमू येऊन तपासणी करणार आहे. त्यानंतरच प्रवेशित विद्यार्थी संख्या नियमित ठेवायची की नाही, याबाबत निर्णय घेऊन ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे निकषांची पूर्तता करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.(प्रतिनिधी)
निकषानुसार भरावी लागणार पदे
सध्या कॉलेज व रुग्णालयात वर्ग १ ची ६४ पदे असून, वर्ग १ व २ च्या एकूण १२ जागा वाढवायच्या आहेत. मॉडर्न मेडिकल अधिकाऱ्यांच्या ११ जागा भरायच्या आहेत. वर्ग ३ ची ७२ पदे, तर नर्सिंगची ८० पदे भरावयाची आहेत. वर्ग ४ ची तब्बल १०८ पदे भरावयाची आहेत. या सर्व रिक्त जागा राज्य शासनाला भराव्या लागणार आहेत.