आयुष पुगलियाला तिहेरी जन्मठेप

By Admin | Published: June 23, 2015 01:46 PM2015-06-23T13:46:36+5:302015-06-23T13:46:36+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी कुश कटारिया या आठ वर्षीय चिमुकल्याची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा आयुष निर्मल पुगलिया (२६) याची दुहेरी जन्मठेप कायम ठेवतानाच..

Ayush Pugalia triple lifelong | आयुष पुगलियाला तिहेरी जन्मठेप

आयुष पुगलियाला तिहेरी जन्मठेप

googlenewsNext


कुश कटारिया हत्याकांड : फाशीच्या शिक्षेची विनंती फेटाळली

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी कुश कटारिया या आठ वर्षीय चिमुकल्याची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा आयुष निर्मल पुगलिया (२६) याची दुहेरी जन्मठेप कायम ठेवतानाच त्याला भादंविच्या कलम ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) अंतर्गतही दोषी ठरवून तिसर्‍या जन्मठेपेची शिक्षा सुनावली. परंतु, त्याला फाशीची शिक्षा देण्याची शासनाने केलेली विनंती फेटाळून लावण्यात आली आहे. आरोपीच्या पहिल्या दोन जन्मठेपेच्या बाबतीत एक जन्मठेप संपल्यानंतर दुसरी जन्मठेप सुरू होणार असून तिसरी जन्मठेप मात्र, त्याला आधीच्या जन्मठेपेसोबतच भोगायची आहे.
न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी हा निर्णय दिला. ४ एप्रिल २0१३ रोजी तत्कालीन सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांनी गोधनी येथील रहिवासी आयुष पुगलियाला भादंविच्या कलम ३0२ (हत्या)अंतर्गत जन्मठेप व एक हजार रुपये दंड, कलम ३६४ (अपहरण) अंतर्गत जन्मठेप व एक हजार रुपये दंड तर, कलम २0१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारवास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयात आरोपीला एक जन्मठेप संपल्यानंतर दुसरी जन्मठेप भोगावी लागेल असे स्पष्ट करण्यात आले होते.
परंतु, आरोपीला खंडणीसाठी अपहरण (कलम ३६४-अ ) या गुन्ह्यातून निर्दोष सोडण्यात आले होते. या निकालाविरुद्ध आयुषने उच्च न्यायालयात अपील केले होते. तसेच, शासनाने दोन अपील्स दाखल केल्या होत्या. एक अपील आयुषला फाशीची शिक्षा देण्यासाठी, तर दुसरे अपील त्याला खंडणीसाठी अपहरणाच्या गुन्ह्यातून निर्दोष सोडण्याला आव्हान देणारे होते.
उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सरकारी पक्ष गुन्हे सिद्ध करण्यात यशस्वी ठरल्याचे निरीक्षण नोंदवून आयुषचे अपील फेटाळून लावले व त्याला सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली. आयुषला खंडणीसाठी अपहरणाच्या गुन्ह्यातून निर्दोष सोडण्याविरुद्ध शासनाने दाखल केलेले अपील मंजूर करण्यात आले व यासंदर्भातील सत्र न्यायालयाचा निर्णय बदलवून आयुषला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु, आयुषला फाशीची शिक्षा सुनावण्यास नकार देण्यात आला व शासनाचे यासंदर्भातील अपील खारीज करण्यात आले. आरोपीने केलेला गुन्हा दुर्मिळातला दुर्मिळ नसून त्याच्यामुळे समाजाला काही धोका आहे असेही म्हणता येत नसल्याचे उच्च न्यायालयाने फाशीची विनंती अमान्य करताना स्पष्ट केले.
आयुषने केली पोलिसांची दिशाभूल
कुशच्या हत्येनंतर कटारिया यांच्या घरी फोन आला. पलिकडून बोलणार्‍याने कुशचे अपहरण केल्याचे सांगून 'दोन कोटींची खंडणी द्या, अन्यथा कुशला ठार मारेन' अशी धमकी दिली. दरम्यान, कुशच्या मित्रांनी तो आयुषच्या मागे गेला होता, अशी माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी आयुषला ताब्यात घेतले. मात्र, त्याने दाद दिली नाही. कुशला चॉकलेट दिल्यानंतर घराजवळच सोडून दिल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला मोकळे केले. पोलिसांनी आरोपीचा छडा लावण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण काहीच हाती लागत नव्हते. यामुळे पोलिसांनी आयुषला पुन्हा एकदा ताब्यात घेतले. आयुषने वेगवेगळी माहिती देऊन तीन दिवस पोलिसांची दिशाभूल केली. प्रत्येकवेळी बयानात तफावत येत असल्यामुळे त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. परिणामी त्याने १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. त्याने कुशची हत्या केल्याचे सांगून कुशचा मृतदेह लपवून ठेवला होता ते ठिकाण पोलिसांना दाखविले. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक पैलू उघड झाले. कुशची हत्या केल्यानंतर आयुष थेट सेंट्रल एव्हेन्यूवरील स्वत:च्या ऑटोमोबाईल्स दुकानात गेला होता. तत्पूर्वी त्याने भाऊ नवीनला मोबाईल करून माझा अपघात झाला आहे, घरून कपडे आणून ठेव असे सांगितले होते. दुकानात पोहोचल्यानंतर त्याने कपडे बदलवले. रक्ताने माखलेले कपडे आयुषने नवीन व नितीन या दोन भावांच्या मदतीने कस्तुरचंद पार्कजवळ एका गटारात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम उघड झाल्यानंतर पोलिसांनी नवीन व नितीनलाही अटक केली होती.

अशी घडली घटना
■ कुश हा सुरुची मसाला कंपनीचे संचालक राजू ऊर्फ प्रशांत कटारिया यांचा मुलगा होता. ११ ऑक्टोबर २0११ रोजी कुश आणि त्याचे दोन मित्र शुभम बैद व रिदम पुरिया हे घराच्या गॅलरीत चिप्स खात बसले होते. दरम्यान, आयुष तेथे आला व त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून कुशला खाली बोलावले. कुश धावतच खाली आला. यानंतर आयुषने कुशला दुचाकीवर बसवून सूर्यनगरातील एका निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात नेले. तेथे आयुषने कुशची निर्घृण हत्या केली. आयुषने आधी कुशच्या डोक्यावर विटेने प्रहार केला. कुश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर त्याने कटरने कुशचा गळा कापला. शेवटी त्याने कुशचा मृतदेह परिसरातील पाण्याच्या टाकीत फेकून दिला.

Web Title: Ayush Pugalia triple lifelong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.