जादूटोण्याच्या संशयावरून बाप-लेकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:27+5:302021-07-14T04:11:27+5:30
मौदा : मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली (तेली) येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका कुटुंबातील दोघांना गावातील काही नागरिकांनी ...
मौदा : मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली (तेली) येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका कुटुंबातील दोघांना गावातील काही नागरिकांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार मांगली (तेली) येथील गजानन राघो मौदेकर (६५) व त्यांचा मुलगा दिनेश गजानन मौदेकर (३५) यांनी शिवणकर कुटुंबातील एका मुलीवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून सत्यशीला शिवणकर, श्यामकला शिवणकर, महेश शिवणकर, विशाल शिवणकर तसेच गावांतील काहींनी मौदेकर यांच्या घरावर हल्ला केला. त्यात दिनेश याला घरातून उचलून नेत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात दोघेही बाप-लेक जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना मौदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. तिथे प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात भांदवि कलम ३२३, ३२४, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार खराबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह ठाकूर करीत आहे. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. याप्रकरणी दोषीवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख आणि कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे यांनी केली आहे.
असा घडला प्रकार
गत काही दिवसांपासून शिवणकर यांची मुलगी आजारी आहे. औषधोपचार करूनही बरी झाली नाही. त्यामुळे आजारी मुलीचे आई-वडील, मोठे आई-वडील व गावातील काही नागरिकांनी दिनेश व गजानन यांच्या घरी जाऊन तुम्ही मुलीला जादूटोणा केला आहे, असे सांगत घराबाहेर ओढले व मारहाण केली.