बाबा गुजर आता अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष
By कमलेश वानखेडे | Published: July 6, 2023 05:28 PM2023-07-06T17:28:34+5:302023-07-06T17:29:00+5:30
Nagpur News अजित पवार गटाकडून गुजर यांची नागपूरच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करीत आपण लढणाऱ्यांच्या सोबत आहोत, असा संदेश देण्यात आला आहे. प्रशांत पवार यांच्यावर विदर्भ प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कमलेश वानखेडे
नागपूर : राष्ट्रवादीत बंडखोरी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थन केल्यावरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बाबा गुजर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून बडतर्फ केले होते. आता अजित पवार गटाकडून गुजर यांची नागपूरच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करीत आपण लढणाऱ्यांच्या सोबत आहोत, असा संदेश देण्यात आला आहे. प्रशांत पवार यांच्यावर विदर्भ प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून कारवाई केली जात आहे. तर कारवाई झालेल्यांना अजित पवार गटाकडून पुन्हा त्याच किंवा मोठ्या पदावर नियुक्त्या दिल्या जात आहेत. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी बोलाविलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्या समर्थनाचा ठराव घेण्यात आला होता. तर त्यापूर्वीच जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जारी केला होता. गुजर यांच्यासह ईश्वर बाळबुधे, सतीश शिंदे, नरेश अरसडे, प्रशांत पवार, राजा आकरे, भागेश्वर फेंडर, रमेश फुले, पुंडलिक राऊत, रवी पराते हे देखील अजित पवार गटात सामील झाले आहेत.