बाबा-महाराज पोलिसांच्या रडारवर
By admin | Published: January 12, 2016 02:50 AM2016-01-12T02:50:18+5:302016-01-12T02:50:18+5:30
चैतन्य आष्टनकर अपहरण कांडाच्या निमित्ताने नागपूर शहर आणि जिल्ह्यातील चोर, भामट्यांपासून तो बुवाबाजी, गंडेदोरे करणारे, बाबा, महाराज आणि कथित भविष्य वर्तविणारे भोंदूबाबाही पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
अपहरणाचे निमित्त : बुवाबाजी करणाऱ्यांची यादी, अनेकांची चौकशी
नरेश डोंगरे नागपूर
चैतन्य आष्टनकर अपहरण कांडाच्या निमित्ताने नागपूर शहर आणि जिल्ह्यातील चोर, भामट्यांपासून तो बुवाबाजी, गंडेदोरे करणारे, बाबा, महाराज आणि कथित भविष्य वर्तविणारे भोंदूबाबाही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. भविष्यात अशी कोणती अनुचित घटना घडल्यास पोलीस चौकशीसाठी बोलवू शकतात, हे भाकीत कळल्याने या सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
चैतन्यच्या अपहरणाची एकूणच पद्धत कळाल्यानंतर या अपहरणकांडात सराईत गुन्हेगार असावा, असा कयास पोलिसांनी लावला. त्यामुळे यापूर्वी अपहरणाच्या गुन्ह्यांशी संबंधित आरोपींची यादी पोलिसांनी बाहेर काढली होती. त्यांच्यातील कोण कारागृहात आहे आणि कोण कारागृहाबाहेर त्याची वर्गवारी करून पोलिसांची वेगवेगळी पथके या सर्वांची ‘आत-बाहेर‘ चौकशी करू लागले.
१२२ जणांची चौैकशी
बाबा-महाराज पोलिसांच्या रडारवर
नागपूर : पोलीस चौकशी करू लागले. मात्र, त्यांच्याकडून कोणताच धागादोरा पोलिसांना गवसला नाही. त्यामुळे नंतर पोलिसांनी सराईत गुन्हेगार, प्रॉपर्टी डिलिंग करणारे आणि चैतन्यच्या वडिलांशी ज्यांचे-ज्यांचे व्यवहार झाले, त्यांची चौकशी केली. मात्र, त्यातूनही काहीच हाती लागले नाही.
दरम्यान, चैतन्यचे अपहरण होऊन २०-२२ तासांचा कालावधी लोटूनही अपहरणकर्त्यांची वाट दाखवणारा मार्ग मिळत नसल्यामुळे पोलीस अस्वस्थ झाले होते. गेल्या वर्षी वर्धा येथे एका निरागस बालकाचे अपहरण आणि हत्या बुवाबाजी करणाऱ्याच्या सल्ल्याने झाल्याची बाब लक्षात आल्यामुळे पोलिसांनी ‘गावागावात भोंदुगिरी करणाऱ्यांकडे नजर वळवली. त्यानुसार, नागपूर आणि आजूबाजूच्या गावातील बुवाबाजी करणारे, गंडेदोरे देणारे, कथित महाराज, भविष्य वर्तविणारे, छोट्या मुलांची पूजा केल्यास धन मिळते, असे आमिष दाखविणारे अशा सर्वांची यादी पोलिसांनी तयार केली. त्यानंतर त्यांना हुडकणे सुरू झाले. १२२ जणांच्या यादीतील प्रत्येकाची एकाच ठिकाणी चौकशी केल्यास खूप वेळ जाईल, याची कल्पना असल्यामुळे एकाच वेळी विविध ठिकाणी या बुवाबाजी करणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. अनेक भोंदूंना, महाराजांना प्रथमच पोलिसांचा दणका कळला.
भविष्यातील संकल्प
भविष्यात अशी वेळ आपल्यावर येईल, अशी कुणालाच कल्पना नव्हती अन् कुणी भविष्यच काय तसे स्वप्नही बघितले नव्हते. त्यामुळे चौकशीच्या वेळी सारेच धास्तावले. या प्रकरणातच नव्हे तर पुढच्या अशा प्रकरणातही ‘पोलिसांच्या चौकशीचा’ सामना करावा लागू शकतो, याची कल्पना चैतन्यच्या अपहरणकांडाच्या निमित्ताने आल्यामुळे अनेकांनी भविष्यात भविष्य बघणार नाही अन् कुणाला काही सांगणारही नाही, असा पोलिसांसमोर संकल्प केला आहे.