नागपुरात साकारतेय बाबासाहेबांच्या वस्तूंचे संग्रहालय!; ९० टक्के ऐतिहासिक वस्तूंवरील रासायनिक प्रक्रिया पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 02:12 AM2019-05-18T02:12:54+5:302019-05-18T02:13:33+5:30
डॉ. आंबेडकरांचे विश्वासू सहकारी धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांना काटोल रोडवरील चिचोली गावी एका महिलेने आपले शेत दान दिले. या जागेवरच त्यांनी शांतिवन प्रकल्प उभारला.
- आनंद डेकाटे
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय साकारत असून यामुळे नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार आहे. संग्रहालयाची अत्याधुनिक इमारत पूर्णत्वास येत आहे.
डॉ. आंबेडकरांचे विश्वासू सहकारी धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांना काटोल रोडवरील चिचोली गावी एका महिलेने आपले शेत दान दिले. या जागेवरच त्यांनी शांतिवन प्रकल्प उभारला. त्यात डॉ. आंबेडकरांनी वापरलेले कपडे, कोट, टाय टोपी, जॅकेट, खुर्ची, यांच्यासह बुद्ध आणि त्यांचा धम्म व भारतीय राज्यघटनेच्या मसुदा ज्या टाइपरायटवर सर्वप्रथम टाईप करण्यात आला
होता, तो टाईपरायटर आदींचा संग्रह आहे.
मात्र येथील संग्रहालय तसे लहान असून शास्त्रोक्त पद्धतीने ते उभारण्यात न आल्याने महामानवाच्या वस्तू नष्ट होण्यास सुरुवात झाली.
शासनाने या प्रकल्पाचे गांभीर्य ओळखले आणि विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत ४० कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. यासोबतच पर्यटन विकासांतर्गत १७ कोटी रुपयाचा निधीही मंजूर केला. या निधीतून आता महामानवाच्या ऐतिहासिक वस्तूंंसाठी भव्य संग्रहालय, ट्रेनिंग इन्स्टिट्युट, मेडिटेशन सेंटर, उपासक गृह, बौद्ध धम्माचे शिक्षण देणारे प्रचारक विद्यालयाची इमारत, वसतिगृह आदी इमारती बांधली जात आहेत.
शांतिवन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयाच्या मुख्य इमारतीसह विविध इमारतींचे काम जोरात सुरू आहे. महामानवाच्या ९० टक्के वस्तूंवर रासायनिक प्रक्रियाही पार पडलेली आहे.
- संजय पाटील,
कार्यवाह, शांतिवन चिचोली