बाबासाहेबांनी कामगारांकडे व्यक्ती म्हणून पाहण्यास शिकविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 09:45 PM2018-03-17T21:45:49+5:302018-03-17T21:45:58+5:30
भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे नेहमीच शोषण करण्यात आले. कामगारांसंदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष आपुलकी होती. ‘थिअरी आॅफ वेल्फेअर’च्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या कल्याणाचे विचार मांडले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी कामगारांकडे व्यक्ती म्हणून पाहण्यास शिकविले, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखक व विचारवंत सुधाकर गायकवाड यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे नेहमीच शोषण करण्यात आले. कामगारांसंदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष आपुलकी होती. ‘थिअरी आॅफ वेल्फेअर’च्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या कल्याणाचे विचार मांडले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी कामगारांकडे व्यक्ती म्हणून पाहण्यास शिकविले, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखक व विचारवंत सुधाकर गायकवाड यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषणादरम्यान ते बोलत होते.
विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार कल्याण व नवीन आर्थिक धोरण या विषयावर या दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरीभाऊ केदार हे मुख्य अतिथी होते तर अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, सन्माननीय अतिथी म्हणून कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम तसेच विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे हे उपस्थित होते. औद्योगिक क्रांतीनंतर कामगार कल्याणाची संकल्पना समोर आली. कामगारांना स्वातंत्र्य हवे, असे बाबासाहेब नेहमी म्हणायचे. मात्र असे म्हणत असताना त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांची सांगड घातली होती. त्यांनी सकारात्मक व नकारात्मक स्वातंत्र्य या संकल्पनादेखील मांडल्या होत्या. पाश्चिमात्य संशोधकांनी याच संकल्पना अनेक वर्षांनंतर जगासमोर आणल्या. कामगारांचे लोककल्याण कायद्यातून शक्य आहे. कामगारांना स्वातंत्र्य मिळत असताना त्यांना सन्मानाने जगण्याचीदेखील संधी मिळाली पाहिजे. तसेच त्यांच्या क्षमतांचा विकास झाला पाहिजे, असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. भांडवलदार असेपर्यंत कामगार कल्याण योजना आवश्यकच आहेत, असे सुधाकर गायकवाड म्हणाले.
कामगार क्षेत्रासंदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मौलिक होते. त्यांचे विचार बोलून दाखविण्यापेक्षा ते कृतीत उतरविणे जास्त आवश्यक आहे. सामाजिक परिवर्तनात कामगार पुढाकार घेऊ शकतात, असे बाबासाहेबांना वाटायचे. सद्यस्थितीत केंद्र सरकारचे धोरण कामगारविरोधी आहे. अशा स्थितीत बाबासाहेबांचे विचार अमलात आणण्याची आवश्यकता आहे, असे मत हरीभाऊ केदार यांनी व्यक्त केले. कुलगुरू डॉ.काणे यांनीदेखील अध्यक्षीय भाषणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या तारखेतदेखील कामगार कल्याणासाठी किती मौलिक आहेत, यावर प्रकाश टाकला. डॉ. प्रदीप आगलावे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.रमेश शंभरकर यांनी संचालन केले तर डॉ.पूरण मेश्राम यांनी आभार मानले.