शिवशाहीर बाबासाहेबांचा नागपूरशी ६५ वर्षांचा ऋणानुबंध; पहिली शिवगर्जना ते शेवटची मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 08:44 PM2021-11-15T20:44:28+5:302021-11-15T20:46:57+5:30
Nagpur News पहिली शिवगर्जना ते अखेरची प्रकट मुलाखत... असा हा ६५ वर्षांचा ऋणानुबंध बाबासाहेब पुरंदरे यांचा नागपुरसोबत राहिला आहे.
प्रवीण खापरे
नागपूर : तारीख २५ डिसेंबर, वर्ष १९५४. स्थळ राजाराम सीताराम वाचनालय अर्थात नागपूर येथे झालेले शिवचरित्रावरील पहिले व्याख्यान ते तारीख २९ सप्टेंबर, वर्ष २०१९, स्थळ राणी लक्ष्मीबाई दुर्गोत्सव मंडळ. लक्ष्मीनगरचा दुर्गोत्सव अर्थातच नागपूर येथे दिलेली अखेरची प्रकट मुलाखतवजा जाहीर व्याख्यान... असा हा ६५ वर्षांचा ऋणानुबंध शंभरीत पदार्पण करून भूलोकीचा निरोप घेऊन अंतिम प्रवासास निघालेल्या पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य श्रीमंत बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांचा आहे.
माझ्या वक्तृत्वाला पैलू पाडण्यात, मला प्रोत्साहन देण्यात आणि शिवकार्यात भरभरून सहकार्य करण्यात नागपूरचे सर्वात मोठे आणि प्रमुख योगदान असल्याचे सांगत, त्याबद्दल मी नागपूरच्या या मातीचे आभार मानत असल्याची भावना बाबासाहेबांनी २९ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्या नागपुरातील अखेरच्या जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली होती.
‘महाराज गेले... शब्दच संपले’ या वाक्याने ‘राजा शिवछत्रपती’ या शिवचरित्राची सांगता करणाऱ्या बाबासाहेबांनी जेव्हा सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला, तेव्हा बाबासाहेबांच्या शिवकार्याचा स्पर्श झालेल्या असंख्य चाहत्यांच्या मनातले शब्दही तेच होते. ‘शिवचरित्राचे वेड अगदी दहा वर्षाचा असतानाच लागले.
तरुण वयात पदार्पण करताच, संशोधनाचा ध्यास लागला. मात्र, संशोधनातून लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्याच अनुषंगाने माझे पहिले व्याख्यान नागपुरातील राजाराम सीताराम वाचनालयात २५ डिसेंबर १९५४ रोजी लागले. याच व्याख्यानापासून विदर्भात ठिकठिकाणी व्याख्याने सुरू झाली आणि नागपूर - विदर्भाने पुस्तकासाठी प्रकाशनपूर्व निधीच जमवून दिला.’ अशी आठवण बाबासाहेबांनी २९ सप्टेंबर, २०१९ रोजीच्या आपल्या नागपुरातील अखेरच्या जाहीर कार्यक्रमात सांगितली होती. ही मुलाखत प्राजक्ता कजगीकर यांनी घेतली होती. या कार्यक्रमानंतर कोरोना संक्रमणामुळे सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे, बाबासाहेबांचे हे अखेरचेच दर्शन नागपूरकरांसाठी ठरले होते.
श्रीकृष्ण आणि छत्रपतींच्या आदर्शाची गरज
‘आज भारताला दोनच आदर्शांची गरज आहे आणि ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण व छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी केलेल्या कार्याचे आणि त्यांच्या वृत्तीचे अनुकरण होईल तरच देशाला आवश्यक असलेले राष्ट्रीय चरित्र निर्माण होतील’, अशी भावना बाबासाहेबांनी आपल्या अखेरच्या जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली होती.
मोबाईलविषयी प्रचंड चीड
शिवचरित्र उलगडताना कोणताही व्यत्यय बाबासाहेबांना नको होता. विशेषत: व्याख्यानादरम्यान वाजणारे मोबाइल, त्यावर बोलणारे नागरिक यांना ते थेट बाहेर जाण्याचे आदेश देत. २०१९च्या अखेरच्या भाषणातही हाच प्रत्यय नागपूरकरांना आला होता. कुण्या एकाचा मोबाइल वाजल्यामुळे, काही वेळ त्यांनी व्याख्यानच थांबवले होते. अखेर मनधरणी केल्यावर व संबंधित व्यक्तीने माफी मागितल्यावर त्यांनी व्याख्यानास सुरुवात केली होती.
नागपूरचा इतिहास उलगडण्याचा मानस
अशाच एका कार्यक्रमात बाबासाहेबांनी नागपूरविषयीची ओढ व्यक्त करत नागपूरकर भोसले, गोंडराजे आणि त्यापूर्वीचा इतिहास उलगडून काढण्याचा मानस व्यक्त केला होता. त्याचे कामही सुरू केल्याचे त्यांनी सांगितले होते.
श्री शिवराज्याभिषेक सोहळा आणि विजयराव देशमुख
नागपुरात महाल, गांधीद्वार येथे श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीद्वारा दरवर्षी होणाऱ्या तिथीनुसारच्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याला ते अगदी प्रारंभावस्थेपासून हजेरी लावत होते. कधी व्याख्यानाला तर कधी सहज भेट म्हणून ते या सोहळ्याला भेट देऊन कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत. याचवेळी त्यांचे ऋणानुबंध ‘शककर्ते शिवराय’कार शिवव्याख्याने विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरुदास महाराज यांच्याशीही जुळले होते.
१९९४ मध्ये नागपुरात ‘जाणता राजा’चा पहिला प्रयोग
इटली येथील राेममध्ये सादर झालेल्या ‘व्हेरोना’ या महानाट्याच्या सादरीकरणाचा प्रभाव बाबासाहेबांवर पडला होता. हे महानाट्य प्रेमकथेवर गुंफण्यात आले होते. हे आजवर जगातील सर्वात मोठे महानाट्य मानले जाते. त्याच धर्तीवर बाबासाहेबांनी ‘जाणता राजा’ हे महानाट्य उभे केले. ‘व्हेरोना’नंतर ‘जाणता राजा’ हे तत्कालीन काळातील दुसरे मोठे महानाट्य ठरले. या नाटकाचा पहिला प्रयोग १९९४मध्ये नागपुरात यशवंत स्टेडियममध्ये झाला होता. त्यानंतर अनेक प्रयोगांचा रसास्वाद नागपूरकरांनी घेतला होता.
‘आमची मैत्री यमराजही तोडू शकत नाही’
बाबासाहेब पुरंदरे आणि राजाभाऊ उपाख्य मकरंद कुळकर्णी यांचे नाते हृदयाने बांधले गेले होते. बाबासाहेब जेव्हा जेव्हा नागपूरला येत तेव्हा तेव्हा त्यांचे थांबणे राजाभाऊंकडेच असे. २८ डिसेंबर २००८ रोजी राजाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान राजाभाऊ कुळकर्णी कृतज्ञता समितीने बाबासाहेबांच्या हस्ते केला होता. तेव्हा.. आमची मैत्री कुणीही तोडू शकत नाही. मृत्यूचा राजा यमराजाकडेही तेवढी क्षमता नाही... असे बाबासाहेब राजाभाऊंच्या मैत्रीबद्दल बोलले होते.
नागपुरात पार पडला सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा
२१ डिसेंबर २००७ रोजी पं. बच्छराज व्यास स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन शंकरनगर येथील मूकबधिर विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी मी वयाची शंभर वर्षे पूर्ण करेल तेव्हा नागपूरकरांनीच माझा सत्कार करावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. नागपूरकरांनी बाबासाहेबांनी त्यांच्या कार्यासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
...........