राष्ट्र उभारणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा!
By admin | Published: April 10, 2017 02:00 AM2017-04-10T02:00:34+5:302017-04-10T02:00:34+5:30
काजव्याचा प्रकाश तोपर्यंतच असतो जोपर्यंत सूर्य उगवत नाही. याप्रमाणेच डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही.
सुनील कदम : पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील द्वितीय प्रबोधन पुष्प
पुसद : काजव्याचा प्रकाश तोपर्यंतच असतो जोपर्यंत सूर्य उगवत नाही. याप्रमाणेच डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही. म्हणून त्यांना जाती किंवा विशिष्ट लोकांचे उद्धारकर्ते म्हणून चाकोरित बांधण्याचा प्रयत्न येथील विद्वान म्हणविणाऱ्यांनी केला. तसेच बाबासाहेबांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वत: लाटून घेण्याचा प्रकारच हे सिद्ध करतो की भारताच्या उभारणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता, असे प्रतिपादन मुंबई येथील आंबेडकरवादी विचारवंत सुनील कदम यांनी केले.
धम्मक्रांती प्रज्ञापर्वानिमित्त आयोजित प्रबोधनमालेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीत योगदान’ या विषयावर ते दुसरे पुष्प गुंफत होते. सुरुवातीला आदर्शनगरच्या चिमुकल्यांनी ‘जय भीमवाल्यांची शान निळा झेंडा’ या गीतावर नृत्य, तर शिवाजी वॉर्ड येथील परिवर्तन बहुद्देशीय महिला मंडळाने सामूहिक बुद्ध वंदना सादर केली. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर भगत, मनोज बागुल, राजेंद्र कांबळे, यशवंत देशमुख, विश्वास भवरे, आर.डी. रणवीर, प्रज्ञापर्वचे अध्यक्ष मिलिंद हट्टेकर उपस्थित होते.
वर्धा येथील सुधीर भगत यांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विषयावर विचार व्यक्त करताना पाली भाषेला अद्यापपर्यंत संविधानिक दर्जा न मिळाल्याची खंत व्यक्त केली. तर मुंबई येथील विचारवंत राजेंद्र कांबळे यांनी अनुसूचित जाती जमाती, ओबीसींची सद्यस्थिती या विषयावर बोलताना देशाच्या आर्थिक बजेटमध्ये आपल्याला न्याय मिळत नसल्याचे सांगत यासाठी आर्थिक विषयावर व्यापक लढा भीमसैनिकांनी उभारावा, असे आवाहन केले.
संचालन भाऊ गवई यांनी, तर आभार दीपक मेश्राम यांनी मानले. सोमवार, १० एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस यांचे ‘राष्ट्रभक्त आंबेडकर आणि भारताचे भविष्य’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. (प्रतिनिधी)