भारताच्या पुनर्बांधणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा

By admin | Published: April 13, 2016 03:10 AM2016-04-13T03:10:18+5:302016-04-13T03:10:18+5:30

स्वातंत्र्यानंतर जे जे प्रश्न देशापुढे निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांचे उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केले आहे.

Babasaheb's contribution in the reconstruction of India is significant | भारताच्या पुनर्बांधणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा

भारताच्या पुनर्बांधणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा

Next

सुखदेव थोरात : वीज वितरण कंपनीतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान
नागपूर : स्वातंत्र्यानंतर जे जे प्रश्न देशापुढे निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांचे उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केले आहे. देशाचे राजकीय स्वातंत्र्य, देशाची राज्यघटना, आर्थिक धोरणे, सामाजिक बांधणी अशा समस्त बाबींवर त्यांनी विचार मांडले आणि या बाबींशी निगडित समस्यांवर उपायही सुचविले. त्यांच्या सूचना त्यावेळी स्वीकाराव्या लागल्या व आजही त्याच विचारांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे अखंड भारताच्या पुनर्बांधणीत डॉ. आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन भारतीय समाज विज्ञान व संशोधन परिषदेचे अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी केले.
महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व डॉ. आंबेडकर जयंती संयुक्त उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. थोरात बोलत होते. डॉ. थोरात यांनी १९२० पासून १९५६ पर्यंतच्या देशातील राजकीय घडमोडींचा लेखाजोखाच यावेळी मांडला. धर्मनिरपेक्ष राष्ट्र, समान न्याय, समान संधी, जातीविरहित समाज या बाबींसह देशाचा आर्थिक व राजकीय विकास या सर्व गोष्टी देशाला स्वीकाराव्या लागल्या. मजूर मंत्री असताना स्त्रियांना समान अधिकार, गरोदर महिलांना रजा, कामगारांसाठी सवलती, रविवारची सुटी अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. शिवाय गोदावरी व्हॅली, हिराकुंड धरण, भाकरानांगल धरण, सोन धरण उभारण्यात डॉ. आंबेडकरांचे विचार आणि कृती मोलाची ठरली आहे. सेंटर वॉटर कमिशन व सेंटर पॉवर कमिशन त्यांनीच स्थापन केले आहे. त्यांच्यामुळेच देशाला जलसंपदा व ऊर्जा मंत्रालय स्थापन करावे लागले. आजची आर्थिक धोरणे त्यांच्या विचारातून तयार झाली आहेत. विकासासाठी लहान राज्यांची संकल्पना त्यांनीच देशाला दिली आहे. हे सर्व केवळ दलितांसाठी नाही तर राष्ट्रासाठी आहे.
स्वातंत्र्यापूर्वी व नंतर देशातील असा कोणताच मुद्दा नाही ज्यावर डॉ. बाबासाहेबांनी विचार मांडले नाही. त्यामुळेच आज राजकारण्यांना कोणत्याही मुद्यावर त्यांच्याच विचारांचा व तत्त्वज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. दुर्दैवाने त्यांचे योगदान जाणूनबुजून झाकले गेल्याची टीका डॉ. थोरात यांनी केली.
या कार्यक्रमाला भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे, कामगार नेते जे.एस. पाटील प्रमुख वक्ते तर मंचावर वीज कंपनीचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, यु.बी. शहारे, सम्राट वाघमारे, राकेश जनबंधू, प्रकाश पवार, महेंद्र ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश पवार व संचालन नाईक यांनी केले.(प्रतिनिधी)

Web Title: Babasaheb's contribution in the reconstruction of India is significant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.