‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’सह बाबासाहेबांचे चार नवीन खंड डिसेंबरपर्यंत येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 07:00 AM2021-10-15T07:00:00+5:302021-10-15T07:00:02+5:30
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रावरील बहुचर्चित पुस्तक ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ आता डिसेंबरमध्ये येणार आहे. यासोबतच आणखीही तीन ते चार नवीन खंड डिसेंबरपर्यंत लोकांच्या हाती येतील.
आनंद डेकाटे
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रावरील बहुचर्चित पुस्तक ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ आता डिसेंबरमध्ये येणार आहे. यासोबतच आणखीही तीन ते चार नवीन खंड डिसेंबरपर्यंत लोकांच्या हाती येतील. यातील काही ग्रंथांच्या छपाईच्या कामालाही सुरुवात झाली आहे, हे विशेष. (Babasaheb's four new volumes with 'Problem of Rupee' will come out by December)
सन २००४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकही नवीन खंड प्रकाशित झालेला नाही. तसेच आजवर प्रकाशित एकाही इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद झालेला नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे गेल्या ३० मार्च रोजी पुनर्गठन झाले. तेव्हापासून नवीन खंड प्रकाशनाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. विशेषत:‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत लोकांपर्यंत यावा, अशी अनेकांची इच्छा होती. त्याला प्रचंड मागणी होती. त्या दिशेने बरेचसे कामही झाले होते. परंतु ते शक्य होऊ शकले नाही. बाबासाहेबांचे नवीन खंड प्रकाशित व्हावे, यासाठी लोकांचा रेटा वाढत चालला आहे. प्रकाशन समितीकडे या संदर्भात अनेक निवेदने रोज पाठवली जात आहेत. विजयादशमीच्या दिवशी एखादा ग्रंथ प्रकाशित होईल, अशी लोकांची इच्छा होती; परंतु ते शक्य झाले नाही.
मात्र येत्या दोन महिन्यांत म्हणजे डिसेंबरपर्यंत किमान चार नवीन खंड प्रकाशित होणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी सांगितले. या चार खंडांत ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या महत्त्वाच्या ग्रंथाचा समावेश आहे, इतकेच नव्हे तर नागपूरच्या शासकीय मुद्रणालयात खंडाच्या छपाईच्या कामालाही सुरुवात झाली आहे हे विशेष. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे मुखपत्र असलेल्या ‘जनता’ या नियतकालिकाच्या दुसऱ्या खंडाचे काम पूर्ण झाले आहे. हा खंडदेखील लवकरच प्रकशित होईल. इंग्रजी खंड-१३ च्या मराठी अनुवादित ग्रंथाचे कामसुद्धा पूर्ण झाले आहे. हा मराठी ग्रंथ १२०० पृष्ठांचा आहे. या ग्रंथाशिवाय सोर्स मटेरिअलचा खंड १ -‘डॉ. आंबेडकर ॲण्ड द मुव्हमेंट ऑफ अनटचेबल्स, खंड ६, खंड ८, खंड १० या ग्रंथाचे पुनर्मुद्रणाचे कामदेखील अंतिम टप्प्यावर आहे. येत्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत चार-पाच खंड विक्रीकरिता उपलब्ध होतील, या दृष्टीने समिती कार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
- दोन अप्रकाशित ग्रंथांचीही माहिती
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या दोन अप्रकाशित ग्रंथाची माहिती मिळाली असून, त्या दोन ग्रंथांचा शोध घेणे सुरू आहे. त्यांपैकी एक ग्रंथ नोव्हेंबरपर्यंत समितीला मिळू शकेल, असे प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती
अशोक विजयादशमीला खंड प्रकाशित न होण्याची परंपरा कायम
- ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ अगोदर ऑगस्टमध्ये प्रकाशित करण्याची मागणी करण्यात आली. ती पूर्ण झाली नाही. नंतर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी प्रकाशित करण्याची मागणी केली. तीही पूर्ण झालेली नाही. अशोक विजयादशमीला खंड प्रकाशन न होण्याची जणू परंपराच झाली आहे. नवीन समितीकडून ही परंपरा खंडित होईल अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली. ३० जुलै २०२१ च्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. नवनियुक्ती सदस्यांनी कृतिशील होऊन खंड प्रकाशन कार्याला गती द्यावी.
- प्रकाश बन्सोड, अध्यक्ष, भारतीय दलित पँथर