बाबासाहेबांचे क्रांती विज्ञान समाजात पेरा : ताराचंद खांडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 01:37 AM2018-12-04T01:37:45+5:302018-12-04T01:40:16+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावाद जागतिक पातळीवर पोहोचविला. महाडचा सत्याग्रह, संविधान निर्मिती आणि धम्मदीक्षेचे क्रांतिशास्त्र हे सर्व मानव कल्याणासाठी होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांचे क्रांतिविज्ञान समाजात पेरा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत ताराचंद खांडेकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावाद जागतिक पातळीवर पोहोचविला. महाडचा सत्याग्रह, संविधान निर्मिती आणि धम्मदीक्षेचे क्रांतिशास्त्र हे सर्व मानव कल्याणासाठी होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांचे क्रांतिविज्ञान समाजात पेरा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत ताराचंद खांडेकर यांनी केले. रिपब्लिकन मुव्हमेंट या साप्ताहिकाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित दिवसभराच्या वैचारिक मंथन कार्यक्रमाचे समारोप करताना ते बोलत होते. उर्वेला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी ‘गेल्या साठ वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीला आम्ही कोणत्या स्तरावर घेऊन आलो आहोत आणि आमची जबाबदारी काय याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी खंत व्यक्त केली. पहिल्या सत्रात पुण्याचे धर्मराज निमसरकार, का. रा. वालदेकर, बुलडाण्याचे सुरेश साबळे, उस्मानाबादच्या अस्मिता मेश्राम, डॉ. सविता कांबळे, धम्मचारी पद्मबोधी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. धम्मचारी पद्मबोधी यांनी ‘आंबेडकरी चळवळ म्हणजे नेमके काय, आंबेडकरी चळवळीचे धयेय काय, आणि ते गाठण्यासाठी साधने कोणती, असे प्रश्न उभे करीत ध्येय स्पष्ट नसेल तर आंदोलन भरकटत जाते, आंदोलन दिशाहीन होते, याकडे लक्ष वेधले. यावेळी ज्येष्ठ चित्रकार अरुण मोटघरे, प्राचार्य भाऊ वासनिक, डॉ. राजाभाऊ टाकसाळे, अशोक सरस्वती, संजय शेंडे, प्रा. रमेश राठोड, पल्लवी जीवनतारे, अनिकेत कुत्तरमारे, सिद्धांत पाटील, शितल गडलिंग, आणि प्रशांत बेले यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक संपादक नरेश वाहणे यांनी केले. संचालन कवी संजय गोडघाटे व शीतल गडलिंग यांनी केले. विलास भोंगाडे यांनी आभार मानले.
बॉक्स..
लोकशाही वाचवणे ही काळाची गरज
देशात अराजकतेचे वातावरण आहे. धर्मसत्तेचा सरकारवर अंकुश आल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. तेव्हा लोकशाही वाचवणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कवी इ.मो.नारनवरे यांनी यावेळी दुसऱ्या सत्रातील मुक्तचर्चेत व्यक्त केले. आर्किटेक्ट नरेंद्र शेलार यांनी प्राक्कथन केले. अस्मिता मेश्राम, सुरेश साबळे, विजय बौद्ध, पल्लवी जिवनतारे, मयूर रंगारी, प्रशांत बेले, अशोक सरस्वती, अशोक मस्के, सुधीर भगत, हरीश नागदेवे, सिद्धांत पाटील, भीमराव गणवीर आदींनी भाग घेतला.