संविधान प्रास्ताविका पार्कमधून तरुणाईपर्यंत जातील बाबासाहेबांचे संस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:03+5:302021-04-14T04:08:03+5:30
योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात ...
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात देशातील पहिला संविधान प्रास्ताविका पार्क साकारण्यात येत आहे. या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व संस्कार तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. ‘कोरोना’मुळे कामाला काहीसा उशीर झाला असला तरी यावर्षी धम्मचक्र प्रवर्तनदिनी या पार्कचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीचे निमित्त साधून विद्यापीठातर्फे संविधान प्रास्ताविका पार्क उभारण्याची संकल्पना सर्वात अगोदर तत्कालीन उपकुलसचिव व आताचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी मांडली होती. देशाचे हे संविधान प्रत्येक भारतीयाच्या हिताचे आहे. संविधानाची ओळख समाज व विशेषत: विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशातून या पार्काच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले. सामाजिक न्याय विभागानेही संविधान प्रास्ताविका पार्क उभारण्यासाठी निधी दिला.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पार्काचे उद्घाटन करण्याचा प्रशासनाचा मानस होता; परंतु कोरोनाचा या कामालादेखील फटका बसला. ‘एनएमआरडीए’कडून शासनाच्या निधीतून काम सुरू असून विद्यापीठातर्फे सांची येथील स्तूप परिसरातील प्रवेशद्वाराप्रमाणेच येथेदेखील प्रवेशद्वार साकारण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठातर्फे निधी देण्यात येणार आहे. कुलगुरुंनीदेखील यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. हे सर्व काम या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती डॉ. अनिल हिरेखन यांनी दिली.
नागपूरला मिळेल नवीन ओळख
संविधान प्रास्ताविक पार्क ही नागपुरची ओळख बनेल. या पार्कच्या माध्यमातून संविधानाचा उद्देश, संवैधानिक संस्थांच कार्यप्रणाली इत्यादींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. बाबासाहेबांना संविधानातून काय अपेक्षित होते व नेमके काय साध्य झाले आहे यावरदेखील माहिती देण्यात येणार आहे. या परिसरात राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, संसद भवन याच्या प्रतिकृती असणार आहेत. या तिन्ही संस्थांमधील काम कसे चालते याचे सचित्र माहिती या पार्कमध्ये मिळेल. अत्युच्च दर्जाचे म्युरल्स साकारण्यात येत आहेत, असे डॉ.हिरेखन यांनी सांगितले.