श्वासही घेऊ शकत नव्हते जीव, बाळांना मिळाले चमत्कारीक जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 07:33 AM2023-11-24T07:33:11+5:302023-11-24T07:34:22+5:30
मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हा चमत्कार झाला.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिच्या पोटात तिळे. नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होण्यापूर्वीच जन्माला आले. वजन दीड किलो. श्वासही स्वत:हून घेता येईना. मात्र डॉक्टर, परिचारिकांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने तिळ्यांना जीवदान मिळाले. शासकीय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हा चमत्कार झाला.
नयनपूर मंडला (मध्य प्रदेश) येथील ओमीट देवेंद्र ठाकूर (२४) पहिल्याच प्रसूतीसाठी मेडिकल इस्पितळात दाखल झाल्या. बाळांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, म्हणून त्याच दिवशी तत्काळ सिझेरियनचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.
एक बाळ न्युओनेटल व्हेंटिलेटरवर, दोन ऑक्सिजनवर
n‘एनआयसीयू’चे डॉ. अभिषेक मधुरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले, साधारण बाळाचे वजन अडीच किलोपेक्षा जास्त असणे गरजेचे असते. परंतु, तिळ्यांचे वजन दीड किलोपेक्षाही कमी होते.
n १.३०० ग्रॅम वजनाचे एक बाळ फारच गंभीर होते. फुफ्फुस विकसित झाले नसल्याने त्याला श्वासही घेता येत नव्हता. त्यामुळे त्याला न्युओनेटल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.
nदुसरे आणि तिसरे बाळ स्वत:हून श्वास घेत असले तरी त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.
बाळांचे वजन कमी
मुदतपूर्व जन्मास आलेल्या तिन्ही अर्भकांचे वजन कमी होते. पहिल्या आणि दुसऱ्या बाळाचे वजन प्रत्येकी १.३०० ग्रॅम आणि तिसऱ्याचे वजन १.४०० ग्रॅम. तीनही मुले आहेत. तिघांनाही तत्काळ ‘एनआयसीयू’मध्ये दाखल करण्यात आले.
दोन बाळांना नुकतेच त्यांच्या आईकडे देण्यात आले. व्हेंटिलेटरवर असलेले पहिले बाळ एनआयसीयूमध्ये आहे. लवकरच त्यालाही आईकडे सुपूर्द केले जाईल. एका बाळाच्या फुफ्फुसासाठी महागडे ‘सरर्फेक्टंट’ इंजेक्शन देणे गरजेचे होते. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी तत्काळ औषधी उपलब्ध करून दिली.
- डॉ. अभिषेक मधुरा