बबलू चौधरी यांना डच संशोधन संस्थेचा पुरस्कार, उंचावला नागपूरचा बहुमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 10:10 PM2017-12-30T22:10:07+5:302017-12-30T22:50:18+5:30
कृषी उत्पादनाचे मार्केटिंग मास्टर अशी ओळख असलेले बबलू चौधरी यांना नेदरलॅन्डमधील संशोधकांच्या संस्थेतर्फे ‘अॅग्री बिझिनेस एक्स्पर्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेदरलॅन्डमध्ये संशोधनासाठी आलेल्या विविध देशातील निवडक तज्ज्ञांना मार्गदर्शन करणाऱ्या बबलू यांना त्यांनी कृषी मार्केटिंगसाठी सादर केलेल्या ‘इनोव्हेटिव्ह व्हॅल्यू चेन मॉडेल’साठी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे त्यांनी नागपूरचा बहुमान जगभरात उंचावला आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : कृषी उत्पादनाचे मार्केटिंग मास्टर अशी ओळख असलेले बबलू चौधरी यांना नेदरलॅन्डमधील संशोधकांच्या संस्थेतर्फे ‘अॅग्री बिझिनेस एक्स्पर्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेदरलॅन्डमध्ये संशोधनासाठी आलेल्या विविध देशातील निवडक तज्ज्ञांना मार्गदर्शन करणाऱ्या बबलू यांना त्यांनी कृषी मार्केटिंगसाठी सादर केलेल्या ‘इनोव्हेटिव्ह व्हॅल्यू चेन मॉडेल’साठी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे त्यांनी नागपूरचा बहुमान जगभरात उंचावला आहे.
एवढ्याशा वयात शंभरावर राष्ट्रीय कृषी परिषदांमध्ये मार्गदर्शन आणि १० आंतरराष्ट्रीय परिषदांमधून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बबलू यांना नाशिकच्या श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रतिष्ठेचा कृषी माऊली पुरस्कार जाहीर झाला असून येत्या २८ जानेवारी रोजी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. पोलीसबॉय बबलू याने अकोल्याहून कृषी पदवी मिळविली. पुढे नेदरलॅन्डकडून पहिल्या वर्षी हार्टीकल्चर मॅनेजमेंट आणि दुसऱ्या वर्षी हार्टीकल्चर चेन मॅनेजमेंट विषयासाठी फेलोशिप प्राप्त करून आपली मास्टर्स डिग्री पूर्ण केली. या काळात संत्र्याच्या चेन मॅनेजमेंटसह अरेबिया आणि अमेरिकेच्या फळांवर रिसर्च पेपरसह रिसर्च प्रोजेक्टही सादर केले. कृषिमालाचे हार्वेस्टिंग, सॉर्टिंग, पॅकेजिंग, जागतिक बाजारपेठेत हवी असेलेली गुणवत्ता आणि ट्रान्सपोर्ट व्यवस्थापन या महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांचे मार्गदर्शन डचच्या संशोधकांनाही आकर्षित करीत आहे. विशेष म्हणजे फेलोशिपनंतर डच संस्थेने बबलू यांना मार्गदर्शक म्हणून पाचारण केले आहे. फेलोशिपसाठी जगभरातून निवड झालेल्या संशोधकांना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. नुकतेच यावर्षी निवडलेल्या विविध देशांमधील ३० निवडक संशोधकांना त्यांनी मार्गदर्शन केले. नेदरलॅन्ड हा स्वत: जगात कृषिमाल निर्यात करणारा क्रमांक एकचा देश आहे. त्यामुळे अशा देशात नागपुरी तरुणाने इतर संशोधकांना मार्गदर्शन करणे एक मोठी कामगिरी आहे. डच संशोधकांच्या संस्थेनेही त्यांची बुद्धिमत्ता आणि कौशल्य महत्त्वाचे मानून त्यांना हा पुरस्कार प्रदान केला हे विशेष.
शेतकऱ्यांच्या प्रगतीचा फॉर्म्युला
भारत हा कृषिप्रधान देश असूनही येथील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. याचे कारण जागतिक मार्केटिंगमध्ये आपण कमी पडतो. शिवाय शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेली रिटेलर, होलसेलर्स, ट्रेडर्स आणि सीएची मधली फळी सर्व नफा गिळंकृत करते. यासाठी ‘फार्मर प्रोड्युसर आॅर्गनायझेशन’ ही संकल्पना महत्त्वाची ठरू शकते. शेतकऱ्यांनी १००-२०० शेतकऱ्यांचा समूह तयार करून थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
एकटा शेतकरी मधल्या दलालांच्या फळीशी लढू शकत नाही. मात्र शेतकऱ्यांच्या समूहाला हे काम सोपे होईल. त्यानुसार ग्रेडिंग, पॅकेजिंगच्या मदतीने ग्राहकांपर्यंत पोहचता येते. जागतिक बाजारपेठेत पोहचण्याचा रस्ता यातून निघू शकतो असा विश्वासही बबलू चौधरी यांनी व्यक्त केला.
जैविक शेती व जागतिक बाजारपेठ
जागतिक बाजारपेठेत कृषिमालाच्या मार्केटिंगसोबत गुणवत्तेलाही महत्त्व आहे. यामुळेच नागपूरच्या संत्र्याला मागणी नाही. भारतातील शेती रासायनिक खतांवर अवलंबून आहे. प्रगत देशांमध्ये रासायनिक खतांचा वापर करून केलेला माल स्वीकारला जात नाही. विशेष म्हणजे नेदरलॅन्डमध्ये जैविक शेतीलाच प्राधान्य दिले जात असून रासायनिक शेतीवर पूर्णपणे बंदी आहे. तेथील शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत नाही आणि तसे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. त्यामुळेच जगात नेदरलॅन्डच्या कृषिमालाला सर्वाधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. ही गुणवत्ता तपासूनच कृषिमालाचा स्वीकार केला जातो. भारतात यासाठी शासकीय यंत्रणांनी पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.