बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या, प्रवीण तोगडियांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 05:39 PM2021-12-06T17:39:57+5:302021-12-06T18:18:14+5:30
बाळासाहेब ठाकरे, यांना भारतरत्न देऊन गौरव करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली. ते आज नागूपरमध्ये बोलत होते.
नागपूर : विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज २९ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त आज ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्यासह अशोक सिंघल, महंत अवैद्यनाथ आणि रामचंद्र परमहंस यांनीही महत्वाची भूमिका पार पाडली. चार लोकांचं नेतृत्व नसतं तर बाबरी पडली नसती आणि मंदिर उभं राहिलं नसतं, असे म्हणत या चौघांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, अशी मागणी त्यांनी केली. तोगडिया यांनी याआधीही ही मागणी केली होती. यासोबतच, जोपर्यंत देशातील हिंदूंना हक्काची घरे मिळणार नाहीत, तोपर्यंत रामराज्य येणार नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
अयोध्येत राम मंदिराची उभारणी होत आहे, याचा आनंद आहे. मी यासाठी माझ्या आयुष्याची ३२ वर्षे, माझा वैद्यकीय व्यवसाय यांचा त्याग केला व त्याचा गर्व असल्याचेही तोगडिया म्हणाले. सोबतच, माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी राम मंदिरासाठी सर्वस्व वाहिले. अयोध्येत २०२०मध्ये झालेल्या राम मंदिराच्या पायाभरणी समारंभात बाबरी मशिदीच्या पक्षकारांना बोलावण्यात आले होते. मात्र, राम मंदिर आंदोलनासाठी आयुष्य वेचूनही मला या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले नव्हते. ही बाब खटकली असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.