करायचा होता परोपकार, नशिबी आले तुरुंगाचे द्वार; निवृत्त शिक्षिकेच्या विरोधात मुलाचीच तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 04:55 PM2022-05-14T16:55:17+5:302022-05-14T17:09:24+5:30

पती आणि मुलाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या या शिक्षिकेने बेवारस मुलाला आईचे ममत्व मिळावे यासाठी हे कृत्य केले. शिक्षिकेचे सत्य समोर आल्यानंतर पोलिसही हतबल झाले.

Baby Selling Racket Busted in Nagpur, a retired teacher arrested for buying new born baby | करायचा होता परोपकार, नशिबी आले तुरुंगाचे द्वार; निवृत्त शिक्षिकेच्या विरोधात मुलाचीच तक्रार

करायचा होता परोपकार, नशिबी आले तुरुंगाचे द्वार; निवृत्त शिक्षिकेच्या विरोधात मुलाचीच तक्रार

Next

नागपूर :नवजात अर्भकांची विक्री करणारी टोळी गुन्हे शाखेने पकडली असून टोळीचा सूत्रधार असलेल्या अनाथाश्रमाच्या संचालकासह चार जणांना पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एका सेवानिवृत शिक्षिकेचाही समावेश आहे. नवजात मुलाला दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत तुरुंगात पोहोचलेल्या या सेवानिवृत्त शिक्षिकेची कहाणी अतिशय वेदनादायी आहे. पती आणि मुलाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या या शिक्षिकेने बेवारस मुलाला आईचे ममत्व मिळावे यासाठी हे कृत्य केले. शिक्षिकेचे सत्य समोर आल्यानंतर पोलिसही हतबल झाले आहेत.

५८ वर्षीय शिक्षिकेचे आयुष्य संकटांनी भरलेले आहे. नवरा घरात किराणा दुकान चालवतो. कुटुंबात पतीशिवाय एक विवाहित मुलगा आहे. काही काळापूर्वी शिक्षिकेच्या मतिमंद मुलाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. मोठा मुलगा आणि पती शिक्षिकेला अमानुष वागणूक देतात. मुलगा तिला ‘आई’ म्हणत नव्हता. पती आणि मुलाच्या या वागण्यामुळे शिक्षिका बराच काळापासून नैराश्याचे जीवन जगत होती. त्यामुळेच शिक्षिकेने अनाथ मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

नवजात बाळांची विक्री करणारे रॅकेट सापडले; अनाथालय संचालकासह चौघांना अटक

यासंदर्भात शिक्षिकेने एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या दोन महिलांशी बोलणे केले. आरोपी नर्ससोबत तिची जुनी ओळख होती. या ओळखीमुळे दोन्ही परिचारिकांनीही शिक्षिकेला मदत करण्याचे मान्य केले. आरोपी खानला शिक्षकाकडून मिळालेल्या तीन लाख रुपयामध्ये त्यांचा हिस्सा नव्हता. खान यांनी शिक्षिकेला ही संपूर्ण प्रक्रिया वैध असल्याचे सांगितले. त्यामुळे शिक्षिकेलाही अडचणीत येण्याची शंका आली नाही. मात्र, अनाथ मुलाला घरात आणताच सख्खा मुलगा आणि पती अस्वस्थ झाले. आपल्या संपत्तीत वाटेकरी आला, असा सख्ख्या मुलाचा समज झाला व याच संतापातून त्याने या संपूर्ण प्रकरणाची पोलिसात तक्रार केल्याची चर्चा आहे. आरोपीच्या अटकेनंतर संपूर्ण सत्य बाहेर आल्याने पोलीसही चक्रावून गेले.

ज्या शिक्षिकेवर आरोप केले जात आहेत, ती प्रत्यक्षात निराश पीडित असल्याचे पोलिसांना लक्षात आले. सख्खा मुलगा आणि पतीच्या वागणुकीमुळे तिने नवजात बालकाला संगोपनासाठी विकत घेतले. मात्र, कायद्यापुढे हतबल झालेल्या पोलिसांना गुन्हा दाखल करून शिक्षिकेला अटक करावी लागली.

Web Title: Baby Selling Racket Busted in Nagpur, a retired teacher arrested for buying new born baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.