कामठी उपजिल्हा रुग्णालयात ते बाळ होते जिवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:09 AM2021-09-27T04:09:10+5:302021-09-27T04:09:10+5:30
नागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात जमिनीवरच प्रसूती होऊन मृत बाळाचा जन्म प्रकरणात आणखी एक वास्तव समोर आले. ...
नागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात जमिनीवरच प्रसूती होऊन मृत बाळाचा जन्म प्रकरणात आणखी एक वास्तव समोर आले. कामठी उपजिल्हा रुग्णालयात काढण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये त्या गर्भवतीच्या पोटातील बाळ जिवंत होते. परंतु, तेथील डॉक्टरांनी प्रसूती न करता तिला डागा रुग्णालयात का पाठविले? या प्रवासादरम्यान की प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.
डागा रुग्णालयात ५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास राणी वासनिक या गर्भवतीच्या प्रसूतीत हलगर्जीपणा झाल्याने पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. याची तक्रार विभागीय आयुक्तांपर्यंत गेल्याने यावर पाच सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या घटनेला गंभीरतेने घेत आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी समितीच्या अहवालाची पुन्हा तपासणी करण्याचे व यात त्रुटी आढळल्यास नव्याने चौकशी करण्याचा निर्णयही घेतला आहे. परंतु, २१ दिवस होऊनही चौकशी अहवाल अद्याप सादर झाला नाही.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, लताला प्रसववेदना सुरू झाल्यानंतर ५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु, तिची गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांनी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. रात्री ११ वाजताच्या सुमारास ती कामठी रुग्णालयात दाखल झाली. तेथील डॉक्टरांनी तपासले असता पोटातील बाळ जिवंत होते. परंतु, तेथील डॉक्टरांनी तिची प्रसूती न करताच नागपूरच्या डागा रुग्णालयात पाठविले. या मागील कारणे अद्यापही स्पष्ट झालेली नाही. यातच चौकशी अहवालात होत असलेल्या उशिरावर वरिष्ठ अधिकारी बोलण्यास तयार नसल्याने शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे.