श्रमिक स्पेशलमध्ये झाला बाळाचा जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:38 AM2020-05-21T00:38:11+5:302020-05-21T00:42:25+5:30
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे असंख्य कामगार आपल्या मूळ गावी परत जात आहेत. त्यांच्यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. अशाच एका श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीत एका महिलेने बाळास जन्म दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे असंख्य कामगार आपल्या मूळ गावी परत जात आहेत. त्यांच्यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. अशाच एका श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीत एका महिलेने बाळास जन्म दिला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरच्या वाणिज्य नियंत्रण कक्षाला सकाळी १० वाजता याबाबत सूचना मिळाली. रेल्वेगाडी क्रमांक ०४४४८ अमृतसर-चांपा श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीत एका महिलेस प्रसूतिवेदना होत होत्या. दरम्यान, ही गाडी पांढुर्ण्याजवळ होती. मध्य रेल्वे प्रशासनाने पांढुर्ण्याचे उपस्टेशन व्यवस्थापक आणि रेल्वे सुरक्षा दलाला माहिती दिली. पांढुर्ण्याच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना बोलावण्यात आले. ही गाडी पांढुर्णा येथे पोहोचताच संबंधित महिलेची तपासणी करून प्रसूतीची तयारी करण्यात आली. दरम्यान, या महिलेने एका गोंडस बाळास जन्म दिला. बाळ स्वस्थ असल्यामुळे त्यांना याच गाडीने जाऊ देण्यात आले. ही गाडी नागपुरात पोहोचल्यानंतर संबंधित महिलेची तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.