नागपूरनजीकच्या रनाळा येथे बाळाचा खून करून उकिरड्यात पुरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 09:50 PM2019-09-19T21:50:45+5:302019-09-19T21:52:12+5:30
औषधोपचारानंतरही बाळाची प्रकृती खालावत असल्याने चक्क आईने २३ दिवसांच्या बाळाचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह उकिरड्यात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कामठी हद्दीतील रनाळा येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कामठी) : जन्माच्या दुसऱ्या दिवसापासूनच बाळाचे (मुलगी) आजारपण सुरू झाले. औषधोपचारानंतरही बाळाची प्रकृती खालावत असल्याने चक्क आईने २३ दिवसांच्या बाळाचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह उकिरड्यात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर, तिने बाळाचे अपहरण झाल्याचा कांगावा करीत पोलिसात तक्रार नोंदविली. मात्र, बिंग फुटले आणि जन्मदात्री आईच मारेकरी असल्याचे स्पष्ट होताच तिला अटकही करण्यात आली. ही घटना कामठी (नवीन) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रनाळा येथे बुधवारी (दि. १८) मध्यरात्री घडली असून, गुरुवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली.
पायल अनिल कनोजे (२२, रा. अरोली, ता. मौदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे (आई) नाव आहे. तिने जन्माष्टमीच्या दिवशी मुलीला जन्म दिला. दुसºयाच दिवशी मुलीची प्रकृती अचानक बिघडल्याने अनिल व पायल यांनी तिला कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती केले. काही दिवस हॉस्पिटलमध्ये थांबल्यानंतर पायल अरोलीला परत गेली.
दरम्यान, ती बुधवारी (दि. १८) तिच्या सासूला सोबत घेऊन कामठी येथे हॉस्पिटलमध्ये आली. मात्र, अनिल मुलीला घेऊन त्याच्या रनाळा (ता. कामठी) येथे राहणाऱ्या मावशीकडे मुक्कामी गेल्याने तीही रनाळ्याला गेली. सकाळी तिने सासूला जागे करून मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची बतावणी करीत हंबरडा फोडला. त्यामुळे घरातील सर्वांनी बाळाचा शोध घ्यायला सुरुवात केली. सर्वत्र शोध घेऊनही बाळ कुठेही आढळून न आल्याने सर्वांनी पोलीस ठाणे गाठून बाळाचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार नोंदविली.
याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदवून पायलला अटक केली. शिवाय, मृतदेह खड्ड्यातून काढत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके करीत आहेत.
अशी केली हत्या
बुधवारी रात्री बाळ पायलजवळ झोपले होते. तिने मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास बाळाचा गळा आवळून खून केला. नंतर बाळाचा मृतदेह शेजारी राहणाऱ्या रणजित लोणारे यांच्या गोठ्याजवळील उकिरड्यात खड्डा करून पुरला. त्यानंतर ती घरी येऊन पुन्हा झोपी गेली. सकाळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पायलची उलटतपासणी केली आणि बिंग फुटले.