अखेर पोटातच बाळ दगावले : डॉक्टर नसल्याने रुग्णवाहिका निरुपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:11 AM2019-08-24T00:11:53+5:302019-08-24T00:12:44+5:30
तिला कसेतरी नागपूर येथील मेयो रुग्णालयामध्ये पोहोचविण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी बाळाचा (मुलगा) गर्भातच मृत्यू झाल्याचे सांगितले. शिवाय मातेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली. हा प्रकार देवलापार (ता. रामटेक) येथे शुक्रवारी घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (देवलापार ): प्रसुतीकळा सुरू झाल्याने महिलेला देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, तेथील डॉक्टर त्यांच्या गर्भवती पत्नीला घेऊन तपासणीसाठी दुसऱ्या डॉक्टरकडे निघून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत रुग्णवाहिकेसोबत जाण्यासाठी दुसरा डॉक्टर नसल्याने त्या महिलेला ताटकळत राहावे लागले. त्यानंतर तिला कसेतरी नागपूर येथील मेयो रुग्णालयामध्ये पोहोचविण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी बाळाचा (मुलगा) गर्भातच मृत्यू झाल्याचे सांगितले. शिवाय मातेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली. हा प्रकार देवलापार (ता. रामटेक) येथे शुक्रवारी घडला.
अरुणा पवन पैठणकर (२२, रा. धारणी, जिल्हा अमरावती) ही महिला गर्भवती असल्याने बाळंतपणासाठी तिच्या माहेरी रामटेकडी (ता. रामटेक) येथे आली होती. ती सात महिन्यांची गर्भवती असतानाच शुक्रवारी पहाटे रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे तिच्या पतीने तिला सकाळी देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्रास वाढल्याने तसेच उपचाराची प्रभावी योय नसल्याने डॉक्टरांनी तिला नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पतीला खासगी रुग्णवाहिका बोलावून तिला नागपूरला हलविणे शक्य झाले नाही. देवलापार ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका आहे. पण, येथील डॉ. अर्जुन भाटिया यांनी त्या रुग्णवाहिकेसोबत जाणे टाळले.त्यांची पत्नी सुधा या गर्भवती असल्याने त्यांना डॉक्टरकडे तपासणीसाठी न्यावयाचे असल्याचे कारणही त्यांनी सांगितले. शिवाय, ते पत्नीला घेऊन खासगी वाहनाने नागपूरला निघून गेले.
पतीने १०८ क्रमांकावर संपर्क साधला. हिवराबाजार, मनसर, पारशिवनी, कन्हान, कोदामेंढी यापैकी कुठेही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. या प्रक्रियेत जवळपास दोन तास निघून गेले. अशातच स्थानिक आशा सेविका कविता भलावी हिने अरुणा यांची गंभीर अवस्था विचारात घेतली आणि रुग्णवाहिकेकरिता बरीच धावपळ केली. तिने १०२ वर फोन करुन दवाखान्याची रुग्णवाहिका बोलावली. सदर रुग्णवाहिका असूनही येथील डॉक्टरांनी थोडी माणुसकी दाखविली नाही. शेवटी तब्बल दोन तासानंतर तिला देवलापार ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने नागपूर येथील डागा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी बाळ एक ते दीड तास आधी पोटातच दगावले असल्याची माहिती डॉक्टरांनी त्यांना दिली.
नॉर्मलसाठी प्रतीक्षा
बाळाला बाहेर काढण्यासाठी अरुणा यांना मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यावेळी सलाईन लावण्यात आली होती. शिवाय, रक्तही चढविण्यात आले होते. नातेवाईकांनी सिझेरियन करुन बाळ काढण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी नॉर्मलच होईल असे सांगत तिथे कोणीही येऊ नये, असे बजावले. सायंकाळी ६ वाजताचे दरम्यान बाळाला पोटातून बाहेर काढण्यात आले. अरुणा यांची प्रकृती गंभीर असून धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.