रवी राणांच्या 'खोके' आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक; म्हणाले १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्यावे अन्यथा...
By कमलेश वानखेडे | Published: October 26, 2022 04:14 PM2022-10-26T16:14:06+5:302022-10-26T16:19:10+5:30
आठ ते दहा आमदार सोबत असल्याचा दावा; सरकारमधून बाहेर पडण्याच्या विचारात?
नागपूर : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन देणाऱ्या अमरावती जिल्ह्यतील आ. बच्चू कडू व आ. रवी राणा यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे बच्चू कडू दुखावले आहेत. समर्थनासाठी पैसे (खोके) घेतल्याचा आरोप करणाऱ्या राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करावे. अन्यथा त्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. आठ ते दहा आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.
बच्चू कडू यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत राणा यांच्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेसमोर येऊन स्पष्ट करण्याची मागणी केली. कडू म्हणाले, पन्नास खोक्यांचा आरोप विरोधकांकडून होत असताना आम्ही दुर्लक्ष केले. पण सत्तेत सहभागी असलेले आ. रवी राणा यांच्याकडून चुकीचे आरोप झाल्याने जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. राणांच्या आरोपामुळे शिंदे सरकारला पाठिंबा देणारे इतर आमदारही दुखावले आहेत. आम्ही आठ ते दहा आमदार एकत्र बसणार आहोत. प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशीही आपण चर्चा करू. १ नोव्हेंबरपर्यंत राणा यांनी माफी मागितली नाही किंवा आरोपाशी संबंधित पुरावे दिले नाही तर वेगळा निर्णय घेऊ व बच्चू कडू स्टाईलनेच आरोपांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
मी स्वबळावर चारवेळा निवडून आलो. तर राणा यांना चार पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला. त्यामुळे आता मंत्रीपद मुद्दा नाही. आता प्रश्न राजकारणाचा नाही तर अस्तित्वाचा आहे, असे सांगत राणे यांनी आरोप करण्यामागे कुणाचेतरी मोठे पाठबळ आहे, असा आरोपही कडू यांनी केला.
षडयंत्राची व्हिडिओ क्लिपिंग येणार
- आ. कडू यांना चुकीचे आरोप करून थंड करायचे. राज्य सरकार मदत करत नसेल तर केंद्र सरकारची मदत घेऊन कडू यांना अडचणित आणायचे, असे षडयंत्र आ. रवी राणा हे आपल्याबाबत आखत असल्याची व्हिडिओ क्लिपिंग चार-पाच दिवसांनी आपल्याकडे येत आहे. ती क्लिपिंग जाहीर करून राणा यांचे फडयंत्र उघडे पाडणार, असा दावाही कडू यांनी केला.
शिंदे-फडणवीस यांना नोटीस देणार
- राणा यांनी चुकीचे आरोप केल्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही नोटीस पाठवून राज्यातील जनतेला या प्रकरणात काय सत्यता आहे, एकातरी आमदाराने पैसे घेतले का, याची सत्यता सांगण्याची मागणी केली जाईल, असेही आ. कडू यांनी स्पष्ट केले.