‘सर्जिकल स्ट्राईक डे’कडे महाविद्यालयांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:18 AM2018-09-30T00:18:01+5:302018-09-30T00:18:49+5:30
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ हा शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांनी याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. आश्चर्याची बाब म्हणजे उच्च शिक्षण विभागाकडून यासंदर्भात शुक्रवारी सूचना प्राप्त झाली. त्यामुळे विद्यापीठाने पाठविलेला संदेश अनेक महाविद्यालयांना उशिरा प्राप्त झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ हा शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांनी याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. आश्चर्याची बाब म्हणजे उच्च शिक्षण विभागाकडून यासंदर्भात शुक्रवारी सूचना प्राप्त झाली. त्यामुळे विद्यापीठाने पाठविलेला संदेश अनेक महाविद्यालयांना उशिरा प्राप्त झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्याने ‘सर्जिकल स्ट्राईक’ पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर या मुद्यावरुन राजकारणदेखील तापले होते. हा दिवस देशभरात ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ म्हणून साजरा व्हावा, असा विचार केंद्र शासनाकडून करण्यात आला. त्याअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाने २० सप्टेंबर रोजी सर्व विद्यापीठांनी ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ साजरा करावा व सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांना बोलावून विद्यार्थ्यापर्यंत सैन्याची शौर्यगाथा पोहोचेल यादृष्टीने कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
याबाबत राज्य शासनानेदेखील २६ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित केला. शौर्यदिवसाच्या निमित्ताने भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा. माजी सैनिकांसमवेत ‘सेल्फी’ काढून ते ‘अपलोड’ करण्याबाबतदेखील राज्य शासनाने निर्देश दिले होते.
मात्र प्रत्यक्षात राज्य शासनाचे हे निर्देश विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांकडून नागपूर विद्यापीठाला २८ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले. त्यानंतर तातडीने सर्व महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांना सूचना पाठविण्यात आल्या. मात्र अनेकांना सूचना प्राप्तच झाल्या नाही. शिवाय महाविद्यालयांना तयारीसाठीदेखील वेळ मिळाला नाही. त्यामुळे काही अपवाद सोडले तर बहुतांश ठिकाणी शौर्य दिवस साजराच झाला नसल्याची स्थिती होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविद्यालयांकडून अहवाल मागविणार
यासंदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांना संपर्क केला असता त्यांनी शौर्य दिवसाबाबत उच्च शिक्षण विभागाकडून शुक्रवारी निर्देश प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले. आम्हाला सूचना मिळताच आम्ही याबाबतची माहिती सर्व संलग्नित महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांना दिली. आता किती जणांनी यानुसार आयोजन केले याची माहिती आम्ही त्यांच्याकडून अहवालाच्या माध्यमातून मागविली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमकी स्थिती स्पष्ट होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
‘सेल्फी’ तर निघालाच नाही
राज्य शासनाच्या निर्देशांनुसार महाविद्यालयांमध्ये माजी सैनिकांना बोलविण्याचे निर्देश होते. माजी सैनिकांसमवेत ‘सेल्फी’ काढून ते ‘अपलोड’ करण्याबाबतदेखील राज्य शासनाने निर्देश दिले होते. मात्र महाविद्यालयांत कार्यक्रमच झाले नाही. त्यामुळे माजी सैनिकांसमवेत ‘सेल्फी’चा मुद्दा हा कागदांवरच राहिला.