रुग्णालयांतच कोरोना नियमांकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:16 AM2021-09-02T04:16:35+5:302021-09-02T04:16:35+5:30
नागपूर : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. गर्दी होणार नाही याची ...
नागपूर : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. मास्क न घालणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरू आहे. मात्र, कोरोनाचे रुग्ण असलेल्या रुग्णालयातच कोरोनाचे नियम डावलले जात असल्याने हे रुग्णालयेच तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरताच सर्वच रुग्णालयात ‘नॉनकोविड’ रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) मार्च, एप्रिल व मे या महिन्यात ५००च्या खाली असलेली ‘ओपडी’ आता दोन हजाराच्या पुढे गेली आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची ‘ओपीडी’ अडीच ते तीन हजारांच्या घरात आहे. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्याच्या स्थितीत रोज ६००वर रुग्ण तपासले जात आहेत. परंतु या तिन्ही रुग्णालयात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाला आहे. डॉक्टरांच्या कक्षासमोर रुग्णांची एकमेकांना खेटून लांब रांग लागलेली असते किंवा दाराजवळ गर्दी झालेली असते. हीच गर्दी औषधींच्या खिडकीवर, एक्स-रे कक्षासमोर, रक्ताचे नमुने घेणाऱ्या केंद्रावर दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे, यातील अनेकांच्या तोंडावर मास्क राहत नसल्याने धोका वाढला आहे.
-सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
मेयोच्या ओपीडीची वेळ सकाळी ८.३० ते १ वाजेची. परंतु येथे सकाळी ९ वाजतापूर्वी डॉक्टर येत नाही. वरिष्ठ डॉक्टरांचे आगमन १० वाजेनंतरच होते. यामुळे रुग्णांची गर्दीही १० ते १२ वाजताच्या दरम्यान होत असल्याचे दिसून आले. केसपेपर काढण्यापासून ते डॉक्टरांच्या कक्षासमोर आपला नंबर लवकर लागावा यासाठी प्रत्येक रुग्ण व नातेवाईक कक्षात घुसण्याचा प्रयत्न करतो. विशेषत: मेडिसीन, गायनिक व आर्थाे विभागात पाय ठेवायलाही जागा राहत नाही, एवढी गर्दी होते. अशीच स्थिती मेडिकलची आहे. केसपेपर काढण्यासाठी रांग लागत असलेतरी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयाचा एक्स-रे विभागात हवा खेळती राहण्यासाठी कोणतीही सोय नाही. दोन एक्स-रे मशीन बंद असल्याने गर्दी वाढते. रुग्णांना तासन्तास कोंढलेल्या कक्षात बसावे लागत असल्याने संसर्ग पसरण्याचे हे केंद्र ठरले आहे. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ओपीडीत रुग्णांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या आहेत. परंतु रुग्णांची गर्दी पाहता एक खुर्ची सोडून कोणीच बसत नाही. येथे तर डॉक्टरांच्या कक्षासमोर रुग्णांची झुंबड उडत असल्याचे दिसून आले.
-मास्क हनुवटीला
‘लोकमत’ प्रतिनिधीने या तिन्ही रुग्णालयातील ओपीडीचा फेरफटका मारल्यावर आजार पसरविणाऱ्याच रुग्णांच्या तोंडावरचे मास्क हनुवटीला असल्याचे दिसून आले. सुरक्षारक्षक, कर्मचारी, परिचारिका किंवा डॉक्टरांनी हटकल्यावर तो मास्क तोंडावर जातो. डॉक्टरांच्या कक्षाबाहेर आल्यावर तोंडावरील मास्कही काढून टाकला जात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, बहुसंख्य रुग्ण ‘एन-९५’ मास्कचा वापर करीत नसल्याचेही आढळून आले.
-रुग्णालये सुपरस्प्रेडर ठरू नये
सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा, मास्कबाबत बेफिकिरी व सॅनिटायझरचा किंवा ठिकठिकाणी हात धुण्याची सोय नसल्याने मेयो, मेडिकल व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुपरस्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. या तिन्ही रुग्णालयात सुरक्षा रक्षकांवर मोठा खर्च होतो. परंतु बहुसंख्य रक्षक मोबाइलवरच बिझी राहत असल्याने, तर काही मास्कचा वापर करीत नसल्याने नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णांना रोखले जात नसल्याचे वास्तव आहे.