परत ‘येरे माझ्या मागल्या’
By admin | Published: June 22, 2015 02:44 AM2015-06-22T02:44:35+5:302015-06-22T02:44:35+5:30
एकेकाळी ज्या अभियांत्रिकी शाखेवर विद्यार्थ्यांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या तेथे जागा भरण्यासाठी कसरतच करावी लागत आहे.
अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया : केवळ ७० टक्के अर्जच दाखल
नागपूर : एकेकाळी ज्या अभियांत्रिकी शाखेवर विद्यार्थ्यांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या तेथे जागा भरण्यासाठी कसरतच करावी लागत आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत उपलब्ध जागांच्या केवळ ७० टक्के अर्ज आल्यामुळे यंदा रिक्त जागांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत वाढ न केल्यामुळे महाविद्यालयांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले आहे.
रविवारी अभियांत्रिकी शाखेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. नागपूर विभागातील ५७ महाविद्यालयांमध्ये २४ हजार ९९२ जागा आहेत. यंदा १८ हजार ५२८ ‘अप्लिकेशन किट’ विकल्या गेल्या होत्या. यापैकी केवळ १७ हजार ४४० म्हणजेच केवळ ६९.७८ टक्के विद्यार्थ्यांनीच अर्ज दाखल करुन अर्ज निश्चिती केली आहे. यातीलही अनेक विद्यार्थी इतर विभागांतील महाविद्यालयांत किंवा इतर अभ्यासक्रमात प्रवेश घेतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जागा शिल्लक राहण्याचा धोका आहे. (प्रतिनिधी)
जागा भरण्यासाठी कसरत
कमी प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळे सगळ्यात मोठा दबाव महाविद्यालय प्रशासनावर आला आहे. अगोदरच अभियांत्रिकीची कमी होत असलेली ‘क्रेझ’, त्यातच दरवर्षी रिक्त जागांची वाढणारी संख्या व चढाओढीची स्पर्धा यातून महाविद्यालयांना जागा भरण्यासाठी अक्षरश: कसरत करावी लागणार आहे. नागपूर विभागात गेल्यावर्षी ११ हजार ८३१ जागा रिकाम्या राहिल्या होत्या. त्यामुळे यंदा विद्यार्थी आपल्याकडे यावे यासाठी महाविद्यालयांचे निरनिराळ्या तऱ्हेने प्रयत्न सुरू आहेत.
व्यवस्थापन कोट्यावर भिस्त
मागील काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची क्रेझ कमी झाली आहे. विभागातील काही मोजक्या महाविद्यालयांनाच विद्यार्थ्यांकडून प्रवेशाकरिता पसंती देण्यात येते. इतर महाविद्यालयांना प्रवेश मिळविण्यासाठी कसरतच करावी लागते. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातून शक्य तितक्या जागा भरण्यावरच भर ठेवला आहे.