पार्श्वगायक स्वप्निल बांदोडकरचे मोबाईल लंपास

By Admin | Published: February 21, 2017 02:07 AM2017-02-21T02:07:32+5:302017-02-21T02:07:32+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकर याचे दोन महागडे मोबाईल लंपास करून ....

Background lover Swapnil Bandodkar's mobile lump | पार्श्वगायक स्वप्निल बांदोडकरचे मोबाईल लंपास

पार्श्वगायक स्वप्निल बांदोडकरचे मोबाईल लंपास

googlenewsNext

अनेकांसमोर चोरी : कार्यक्रमाचा बिघडला सूर
नरेश डोंगरे नागपूर
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकर याचे दोन महागडे मोबाईल लंपास करून चोरट्याने त्याचे सूर बिघडवले. रविवारी रात्री ९ च्या सुमारास एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडल्यानंतर स्वप्नीलसोबतच आयोजकांचाही मूड गेला.
राधा ही बावरी... हरीची ..... या गीतामुळे प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या स्वप्नीलचा रविवारी रात्री व्हीएनआयटीच्या सभागृहात कार्यक्रम होता. रसिकांची प्रचंड गर्दी पाहून स्वप्नीलही उत्साहित झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभीच त्याने रसाळ सुरांची उधळण करीत प्रेक्षकांकडून प्रचंड दाद घेतली. कार्यक्रम रंगात आला. गाणे सुरू असल्यामुळे स्वप्नीलने त्याचा आयफोन-७ आणि सॅमसंग गॅलक्सी हे दोन मोबाईल ‘फोन स्टॅण्ड’वर ठेवले. शब्दरचना बघण्यासाठी त्याने हे मोबाईल स्टॅण्डवर ठेवले होते. गाणे संपताच मंचाच्या बाजूला असलेल्या मदतनिसाने हे स्टॅण्ड उचलून बाजूला ठेवले. काही वेळेनंतर स्वप्नील तेथे पोहचला तेव्हा स्टॅण्डवर दोन्ही मोबाईल नव्हते. त्याने आजूबाजूच्यांना विचारणा केली. कुणीच मोबाईलबद्दल बोलेना. त्यामुळे कावराबावरा झालेल्या स्वप्नीलने आयोजकांच्या कानावर माहिती घातली. स्वप्नीलचे महागडे मोबाईल लंपास केल्याची कुजबूज सभागृहात वाढली. त्यामुळे रंगतदार कार्यक्रमाचा नूर पालटला. स्वप्नीलचा मूड गेला अन् आयोजकांच्या उत्साहावरही विरजण पडले. शेकडो रसिक आजूबाजूला असताना चोरट्यांनी फोन चोरण्याचा निर्ढावलेपणा दाखवल्याने स्वप्नीलसह साऱ्यांनाच धक्का बसला आहे.
दरम्यान, दोन्ही फोन चोरीला गेल्यामुळे कुणाशी आणि कसा संपर्क करावा, असा प्रश्न स्वप्नीलसमोर होता. आयोजकांच्या माध्यमातून स्थानिक मित्रांशी कसाबसा संपर्क साधला. त्यानंतर रविवारी रात्री १० च्या सुमारास स्वप्नील बजाजनगर ठाण्यात पोहचला. तेथे त्याने मोबाईल फोन चोरीला गेल्याबाबतचा तक्रारअर्ज दिला. दरम्यान, एका मित्राच्या माध्यमातून गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडेही ही माहिती पोहचली. त्यांनी त्याची लगेच दखल घेत सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती काढणे सुरू केले.(प्रतिनिधी)

दोन मोबाईल दोन दिशेला
सायबर शाखेने मोबाईल फोन ट्रॅकिंग सिस्टटमवर टाकले असता एक फोन राजनगरात तर दुसरा फोन सीताबर्डीच्या इलेक्ट्रॉनिक मार्केट परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात, हे फोन चोरणारे आरोपी दोन किंवा दोनपेक्षा जास्त असल्याचा अंदाज त्यातून काढण्यात आला असून, घटनेच्या वेळी स्टेजजवळ घुटमळणाऱ्यांपैकीच कुणी ते लंपास केल्याचा कयास पोलिसांनी बांधला. त्या दृष्टीने फोन चोरणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, चोरीला गेलेल्या फोनची किंमत दीड लाख रुपये असल्याची माहिती स्वप्नील बांदोडकरने प्रस्तुत प्रतिनिधीसोबत बोलताना दिली.

Web Title: Background lover Swapnil Bandodkar's mobile lump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.