पश्चिम विदर्भात १.६३ लाख हेक्टर सिंचनाचा अनुशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:38 PM2020-02-13T22:38:46+5:302020-02-13T22:41:53+5:30
जून २०१९ अखेरपर्यंत पश्चिम विदर्भात १ लाख ६३ हजार १३९ हेक्टर इतका सिंचनाचा अनुशेष कायम आहे. यावर जवळपास १५,४८८ कोटी रुपयांची आवश्यकता आहे, अशी माहिती विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पश्चिम विदर्भातील (अमरावती विभाग) आर्थिक अनुशेष २०११ मध्ये संपुष्टात आला असला तरी भौतिक अनुशेष अजूनही संपलेला नाही. जून २०१९ अखेरपर्यंत पश्चिम विदर्भात १ लाख ६३ हजार १३९ हेक्टर इतका सिंचनाचा अनुशेष कायम आहे. यावर जवळपास १५,४८८ कोटी रुपयांची आवश्यकता आहे, अशी माहिती विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली.
आ. संचेती यांनी सांगितले, अमरावती विभागाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी डिसेंबर २०१९ पर्यंत अनुशेष निर्मूलन कार्यक्रमांतर्गत १५,१७६.६५ कोटी खर्च झाले. यातील १४,४०१.०५ कोटी मार्च २०१९ पर्यंत झालेले असून २०१९-२० या वर्षामध्ये डिसेंबर २०१९ अखेर सुमारे ७७५.८० कोटी रुपये खर्च झालेले आहे. सध्या असलेला अनुशेष दूर करण्यासाठी आणखी १५,४८८ कोटीची आवश्यकता आहे. यापैकी जिगाव प्रकल्पाचीच नवी सुधारित प्रशासकीय मान्यता १३ हजार कोटीची आहे. यासोबतच बळीराजा जलसंजीवनी व प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजनेमधून केंद्रीय अर्थसाहाय्य व नाबार्ड कर्जाद्वारे अतिरिक्त निधी उभारण्यात येत आहे. अनुशेष निर्मूलन कार्यक्रमांतर्गत समाविष्ट प्रकल्पांपैकी २ मोठे प्रकल्प पंतप्रधान कृषी संजीवनी योजना अंतर्गत व ४१ प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. अनुशेषांतर्गतच्या एकूण १०२ प्रकल्पांपैकी ८१ प्रकल्पांना सुप्रमा मिळाल्या आहेत. २ प्रकल्पात सुप्रमा प्रतीक्षेत आहे. ३ प्रकल्पांचे प्रस्ताव त्रिसदस्यीय समितीकडून मंजूर झाले आहेत. १५ प्रकल्पांमध्ये वन विभागाची मान्यता असून १२ प्रकल्पांना अंतिम मान्यता मिळाली आहे. ३ प्रकल्प शिल्लक आहेत. एकूणच अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात असून २०२२-२३ मध्ये हा अनुशेष दूर होईल, असा विश्वास असल्याचे आ. संचेती यांनी सांगितले. पत्रपरिषदेला विदर्भ विकास मंडळाचे सदस्य सचिव हेमंत पवार उपस्थित होते.
अनुशेष दूर करण्यासाठी वर्षनिहाय उपलब्ध निधी व झालेला खर्च
वर्ष उपलब्ध निधी (कोटीत) खर्च (कोटीत)
मार्च २०१३ २०८० ८६१
मार्च २०१४ २१०८ ८८२
मार्च २०१५ १२२१ १००४
मार्च २०१६ २२४० २०५५
मार्च २०१७ १६७७ १६९५
मार्च २०१८ १९४८ १४५३
मार्च २०१९ १२६७ १४७७
मार्च २०२० १२७५ ७७६ (डिसेंबर अखेर)