ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा अनुशेष; विद्यापीठासमोर ‘जीईआर’ वाढविण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 12:29 PM2022-03-29T12:29:52+5:302022-03-29T12:39:11+5:30
कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण असतानादेखील विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार तालुक्यांतील ‘जीईआर’ची स्थिती जैसे थे आहे. अशा स्थितीत हा अनुशेष दूर करण्याचे मोठे आव्हान नागपूर विद्यापीठासमोर आहे.
योगेश पांडे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांची नोंदणी होते. मात्र प्रत्यक्षात संबंधित वयोगटातील लोकसंख्येचा विचार केला असता विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचा ‘जीईआर’ (ग्रॉन इनरोलमेन्ट रेशियो) ३९ टक्क्यांवर कायम असून त्यात वाढ झालेली नाही. ग्रामीण भागात तर विद्यार्थ्यांच्या नोंदणीचाच अनुशेष आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण असतानादेखील विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार तालुक्यांतील ‘जीईआर’ची स्थिती जैसे थे आहे. अशा स्थितीत हा अनुशेष दूर करण्याचे मोठे आव्हान नागपूर विद्यापीठासमोर आहे.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासाठी नोंदणी करणे अपेक्षित असते. मात्र शैक्षणिक असमतोलाचा फटका विद्यार्थ्यांनादेखील बसतो. विविध कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक कारणांमुळे विद्यार्थी बारावीनंतर पदवी शिक्षणासाठी प्रवेशच घेत नाहीत. त्यामुळे ‘जीईआर’चे प्रमाण वाढत नाही, असे विद्यापीठ कार्यक्षेत्रात चित्र आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्याचे उच्चशिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण म्हणजेच ‘जीईआर’ हा ३९.८० टक्के आहे. मात्र अनेक विद्यार्थी हे बाहेरील विद्यापीठात शिक्षणासाठी जातात. त्यामुळे नागपूर विद्यापीठाचा प्रत्यक्ष ‘जीईआर’ हा अवघा २४.७५ टक्के इतका आहे. काही तालुक्यांमध्ये तर ‘जीईआर’चे प्रमाण अवघे १५ टक्के इतकेच आहे. येथील विद्यार्थ्यांची उच्चशिक्षणासाठी कमी प्रमाणात होणारी नोंदणी हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. हिंगणा (१३.९२ %), आष्टी (१२.५६%), तुमसर (२१.५२ टक्के) व तिरोडा (१५.२९ %) असे ‘जीईआर’चे प्रमाण आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्येदेखील हीच आकडेवारी होती. तीन वर्षांत यात काहीही सुधारणा झालेली नाही व विद्यापीठाकडूनदेखील त्यासाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत.
नागपूर आघाडीवर तर गोंदिया जिल्हा पिछाडीवर
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चार जिल्हे असून यात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया यांचा समावेश आहे. २०२१ साली नागपूर जिल्ह्याचा ‘जीईआर’ सर्वाधिक ५५.८१ टक्के इतका होता. सर्वात कमी १५.२९ टक्के ‘जीईआर’ गोंदिया जिल्ह्याचा होता.
ग्रामीण भागात महाविद्यालयांची आवश्यकता
कमी ‘जीईआर’ असलेल्या भागांमध्ये शैक्षणिक सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे. विशेषत: ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू करुन तेथे पायाभूत सविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत. विद्यापीठाच्या बृहत आराखड्यात हिंगणा, आष्टी, तुमसर, तिरोडा येथे २०२४ पर्यंत नवीन महाविद्यालये स्थापन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठातील अधिकाऱ्यांनादेखील सद्यस्थिती माहिती नाही.
‘जीईआर’ची आकडेवारी
जिल्हा - ‘जीईआर’
नागपूर -५५.८१ %
वर्धा - २९.५० %
भंडारा -२१.१९ %
गोंदिया- १५.२९ %