मागासवर्गीयांचा निधी त्यांच्यासाठीच खर्च व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:44 AM2017-10-23T01:44:05+5:302017-10-23T01:44:15+5:30
अनुसूचित जाती व आदिवासींच्या कल्याणासाठी असलेला निधी शेतकरी कर्जमाफीसाठी न वळविता त्यांच्या कल्याणासाठीच खर्च करावा, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनुसूचित जाती व आदिवासींच्या कल्याणासाठी असलेला निधी शेतकरी कर्जमाफीसाठी न वळविता त्यांच्या कल्याणासाठीच खर्च करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली. यासंदर्भात आ. गजभिये यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
अनुसूचित जाती व आदिवासींच्या कल्याणासाठी असलेला अनुक्रमे अनुसूचित जातीसाठी १३ टक्के तर अनुसूचित जमातीसाठी असलेला ७ टक्के हक्काचा संविधानिक निधी फक्त त्यांच्या कल्याणासाठीच खर्च करण्याची कबुली मागील पावसाळी अधिवेशनात दिल्यानंतरही हा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वळविण्यात आला.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आदिवासांच्या विकासासाठी १०० टक्के विकास निधी उपलब्ध असतानाही सन २०१४ ते २०१५ तर २०१५ ते २०१६ आणि २०१६ ते २०१७ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती -जमातीच्या विकासासाठी प्रत्यक्षात फक्त ३१ टक्केच निधी खर्च करण्यात आलेला आहे. जवळपास १५ ते २० हजार कोटी निधी हा खर्चच करण्यात आलेला नाही, हा मागासवर्गीयावर फार मोठा अन्याय आहे.
म्हणून अनुसूचित जाती व जमाती यांच्या कल्याणार्थ बजेट मधील तरतुदीनुसार असणारा निधी फक्त त्याच प्रवर्गासाठी खर्च करावा, अन्यत्र वळविल्यास अधिकाºयांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई व्हावी, असा कठोर कायदा ओडिशा, आंध्रप्रदेश, कर्नाटकच्या धर्तीवर राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा, अशी मागणी आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.