अतिनील किरणांच्या उपयोगाने बॅक्टेरियल संसर्ग टाळता येतो : बिल पाल्मर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 08:46 PM2019-11-18T20:46:52+5:302019-11-18T20:48:21+5:30
अल्ट्राव्हॉयलेट किरणे ही तशी मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतात. ओझोनच्या स्तरामुळे त्या अतिनील किरणांपैकी ‘युव्ही-सी’चा (अल्ट्राव्हॉयलेट-सी अतिनील किरण) योग्य वापर केला तर बॅक्टेरियांची वाढ खुंटवून त्यामुळे संसर्ग टाळता येतो, अशी माहिती अमेरिकेतील एरोमेडचे अध्यक्ष आणि पर्यावरण अभ्यासक बिल पाल्मर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्ट्राव्हॉयलेट किरणे ही तशी मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतात. ओझोनच्या स्तरामुळे त्या अतिनील किरणांपैकी ‘युव्ही-सी’चा (अल्ट्राव्हॉयलेट-सी अतिनील किरण) योग्य वापर केला तर बॅक्टेरियांची वाढ खुंटवून त्यामुळे संसर्ग टाळता येतो, अशी माहिती अमेरिकेतील एरोमेडचे अध्यक्ष आणि पर्यावरण अभ्यासक बिल पाल्मर यांनी दिली.
‘ब्रिथ ट्रस्ट’च्यावतीने ‘हेल्थी एअर इनिशिएटिव्ह’ अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे, आरोग्य मंत्रालयाचे सल्लागार डॉ. सुनील खापर्डे, कार्यक्रमाचे समन्वयक व श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र सरनाईक, कार्यक्रमाचे सहसमन्वयक डॉ. मिलिंद भृशुंडी उपस्थित होते.
पाल्मर म्हणाले, अतिनील किरणे कुठल्याही खोलीच्या मानवी उंचीच्या वर भू-पातळीला वा छताला समांतर असावी. त्या खोलीतील बॅक्टेरियांचा प्रवास छतापर्यंत होत असतो. जेव्हा छताच्या खाली त्याला समांतर अतिनील किरणे(अप्पर रुम जीयुव्ही)बसविल्यास, तेव्हा त्या किरणांच्या संपर्कात आलेल्या बॅक्टेरियांच्या डीएनएवर प्रभाव पडतो. त्यांचे पुनरुत्पादन थांबते. त्यामुळे बॅक्टेरियांमुळे होणारे आजार त्या खोलीतील लोकांना होत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
श्वसन रोगांचे मूळ शोधणे आवश्यक-डॉ. वटे
डॉ. वटे म्हणाले की, २.५ ते १० मायक्रॉनच्या कणांसोबत संलग्नित असलेले कार्बन, हायड्रोकार्बन, बेंझिन व विषाणू यांचा अभ्यास केल्या गेला तर श्वसन रोगांचे मूळ कळेल. या पदार्थांचे हवेतील प्रमाण, त्याची गुणवत्ता, त्याचे उगमस्थान काय आहे, ही माहिती जरी संशोधनातून समोर आली तर त्यावर नियंत्रण मिळविता येईल. शरीरात शिरण्यापासून बचाव करण्यासंबंधी नियंत्रण तंत्रज्ञान विकासित करता येईल. पर्यायाने श्वासाद्वारे पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळविता येणे शक्य होईल.
स्वच्छ हवेत श्वास घेणे हा मूलभूत अधिकार-डॉ. सरनाईक
‘ब्रिथ ट्रस्ट’च्या माध्यमातून ‘हेल्दी एअर इनिशिएटिव्ह’ घेण्यात आला असून सगळ्यांचा स्वच्छ हवेत श्वास घ्यायला मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. त्या अनुषंगाने उपक्रम राबविण्याचा विश्वास डॉ. सरनाईक यांनी व्यक्त केला. आभार डॉ. भृशुंडी यांनी मानले. कार्यक्रमाला न्यूरोसर्जन डॉ. लोकेंद्रसिंह, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. बी.ओ. तायडे, डॉ. प्रदीप देशमुख, डॉ. वरुण भार्गव, डॉ. नंदकिशोर, डॉ. हरीश वरभे, डॉ. राजेश बल्लाळ, डॉ. श्याम देशपांडे, डॉ. एस. पालिवाल उपस्थित होते.